पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी मंत्री आझम खान यांना न्यायालयाने आणखी एका प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यावेळी त्यांना डुंगरपूर प्रकरणात सात वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड करण्यात आला आहे. ही शिक्षा त्यांना रामपूर न्यायालयाने सुनावली आहे. यापूर्वी त्यांना बोगस जन्म प्रकरणी ७ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा देखील न्यायालयाने दोषी ठरवत, तिघांनाही ७ वर्षाची शिक्षा सुनावली होती. सध्या 'सपा' नेते आझम खान सीतापूर कारागृहात आहेत. (Azam Khan)
आझम खान यांच्यासोबतच माजी सीओ सिटी आले हसन खान, माजी नगराध्यक्ष अझहर खान आणि बरेलीचे कंत्राटदार बरकत अली यांना देखील पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर या तिघांना न्यायालयाने प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Azam Khan)
आझम खान यांना आतापर्यंत पाच प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. पाच महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम याच्या बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणातही त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या प्रकरणी ते सध्या सीतापूर कारागृहात शिक्षा भाेगत आहेत. त्यांची पत्नी माजी खासदार ताजीन फातमा आणि मुलगा माजी आमदार अब्दुल्ला आझम यांना यापूर्वीच सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
2019 मध्ये डुंगरपूर वसाहत खाली करताना 12 गुन्हे दाखल झाले. यातील एक गुन्हा याच वसाहतीतील रहिवासी एहतेशम याने नोंदवला होता. दरम्यान त्यांने आझम खान यांच्यावर गुन्हेगारी कटाचा आरोप केला होता. तर इतरांवर घर फोडणे, प्राणघातक हल्ला, धमकावणे, दरोडा आदी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची खासदार-आमदार सत्र न्यायालयात 4 मार्च रोजी सुनावणी पूर्ण झाली. शनिवारी न्यायालयाने आझम खानसह चौघांना दोषी ठरवले.