Azam Khan : आझम खान यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची सहमती | पुढारी

Azam Khan : आझम खान यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची सहमती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.२००७ मध्ये उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या विरोधात द्वेषयुक्त भाषण करीत अवमानजनक भाषेच्या वापर केल्या प्रकरणात आवाजाचा नमुना देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला खान यांनी आव्हान दिले आहे.

रामपुर येथील टांडा परिसरातील एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून हा प्रकार समोर आला होता.याप्रकरणात टांडा पोलीस स्टेशनमध्ये आझम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्या. एस. व्ही. भट्टी यांच्या खंडपीठासमक्ष खान यांच्यावतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करीत प्रकरणावर तत्काळ सुनावणीची विनंती केली.उद्या,बुधवार न्यायालय खान यांच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहे.आझम यांनी २५ जुलैला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.न्यायालयाने आझम यांची याचिका फेटाळत रामपुर न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवले होते.

Back to top button