पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीने भारताचा युवा फिरकी पटू अक्षर पटेलला (Axar Patel) 'प्लेअर ऑफ द मंथ' (ICC Player of The Month) पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे. या शिवाय पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांची नावे या यादीत आहेत. या तिघांमधून एकाला सप्टेंबर मधील 'प्लेअर ऑफ द मंथ' खेळाडू घोषित केला जाणार आहे. अक्षर पटेलने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेत केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर त्याला आयसीसीने नामांकन दिले आहे.
आयसीसीने सप्टेंबर महिन्यातील 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी तीन खेळाडुंची निवड केली आहे. या पैकी एकजण या पुरस्काराचा मानकरी ठरेल. त्या तीघांच्या यादीत भारताचा अष्टपैलू तथा फिरकीपटू अक्षर पटेलची निवड करण्यात आली आहे. २८ वर्षांच्या अक्षर पटेलने (Axar Patel) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी २० मालिकेत कमाल केली होती. त्याने मोहाली येथे खेळविण्यात ओलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात १७ धावा देत ३ बळी घेतले होते. यानंतर नागपूर येथे खेळविण्यात आलेला सामना पावसामुळे ८ – ८ षटकांचा खेळविण्यात आला होता. या सामन्यात अक्षरने दोन षटकात १३ धावा देत ग्लेन मॅक्सवेल आणि टीम डेव्हिड यांचे बळी घेतले. शिवाय हैदराबाद येथील सामन्यात पुन्हा दोन बळी मिळवत त्याने या सामन्यात दोन महत्त्वाच्या भागिदाऱ्यांना सुरुंग लावले.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेनंतर अक्षरचा (Axar Patel) फॉर्म दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा टी २० मालिकेत देखील कायम राहिला. आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या सामन्यात अक्षरने ४ षटकात १६ धावा देत १ बळी घेतला, दुसऱ्या सामन्यात ४ षटकात ५३ धावा देत १ बळी मिळवला तर तिसऱ्या सामन्यात त्याने १ षटक टाकले यामध्ये त्याने १० धावा दिल्या पण त्याला बळी घेण्यात यश आले नाही. पण एकूण सहा सामन्यांमध्ये त्याने ९ बळी घेण्याची कामगिरी बजावली. याच्या रुपाने भारतला एक चांगला अष्टपैलू खेळाडू खेळवण्याची संधी निर्माण झाली आहे. युजवेंद्र चहल किंवा आर अश्वीनच्या जोडी सोबत अक्षर पटेलचा चांगला पर्याय भारताकडे उपलब्ध आहे. तसेच तो आपल्या फलंदाजीच्या जोरावर निर्णायक धावा करण्याची धमक ठेवतो.
भारताच्या अक्षर पटेल (Axar Patel) सोबत पाकिस्तानचा स्फोटक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरुन ग्रीन यांचा समावेश 'प्लेअर ऑफ द मंथ'च्या यादीत करण्यात आलेला आहे. मोहम्मद रिझवान सर्वांना आश्चर्य चकीत केले आहे. त्याचा फलंदाजीतून अक्षरशा: धावांचा पाऊस सध्या पाडत आहे असेच म्हणावे लागेल. टी २० क्रमवारी मोहम्मद रिझवान प्रथम क्रमांकावर आहे. तसेच मागील १० टी २० सामन्यांमध्ये त्याने तब्बल ७ अर्धशतके झळकावली आहेत. यावरुनच त्याच्या फलंदाजीचा अंदाज लावता येऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात त्याने आशिया चषका दरम्यान दोन ७० धावांच्या खेळी केल्या आणि या स्पर्धेत त्याने तब्बल २८१ धावा कुटल्या. तर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने चार अर्धशतके झळकावत चारी वेळा ६० हून अधीकचा स्कोर केला. तसेच या मालिकेत त्याने ३१६ धावा केल्या आहेत. या पुरस्कारासाठी रिझवान हाच प्रबळ दावेदार मानला जात आहे.
ऑस्ट्रेलियाचा कॅमरुन ग्रीन (Cameron Green) याने या यादीत नाव पटकावले आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसी सामन्यात ८९ धावांची नाबाद खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात त्याने १२ चेंडूत २५ नाबाद खेळी करत प्रतिस्पर्ध्यांचे दोन बळी टिपले. भारता विरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात त्याने डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत ३० चेंडूत ६१ धावांची तर दुसऱ्या सामन्यात २१ चेंडूत ५० धावांची वादळी खेळी केली. या कामगिरीमुळे 'प्लेअर ऑफ द मंथ'साठी त्याला नामांकन मिळाले आहे.
अधिक वाचा :