AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात पाकिस्तानचा मालिका पराभवाचा ‘षटकार’! वॉर्नरची विजयी खेळी

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात पाकिस्तानचा मालिका पराभवाचा ‘षटकार’! वॉर्नरची विजयी खेळी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरूद्धच्या तीन कसोटी मालिकेत 3-0 असा एकतर्फी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले आहे. मालिकेतील अखेरच्या सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून विजय मिळवला. या मालिके दरम्यान पाकिस्तानला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. (AUS vs PAK)

ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेदरम्यान पाकिस्तान संघाला एकही सामना जिंकता आला नाही. असे सलग सहाव्यांदा घडले आहे. यामध्ये त्यांचा शेवटचा विजय 1995 साली झालेल्या मालिकेत झाला होता. कांगारू संघाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा हा शेवटचा कसोटी सामना होता. सामन्यात त्याने शानदार कामगिरी करत त्याने संघाला विजयी केले. (AUS vs PAK)

पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात 313 धावा केल्या. तर या आव्हानचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 299 धावांवर गुंडाळला. यामुळे पाकिस्तानला पाकिस्तानला 14 धावांची आघाडी मिळाली, मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्यात पाकिस्तानचा दुसरा डाव 115 धावांवर गुंडाळला. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी हे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण केले.

लॅबुशेन-वॉर्नरने झळकावली अर्धशतके

मार्नस लॅबुशेनने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक नाबाद 62 धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने कारकिर्दीतील शेवटच्या डावात 57 धावा केल्या. संघाला विजयासाठी 11 धावांची गरज असताना तो बाद झाला. त्याच्या पाठोपाठ फलंदाजीला आलेल्या स्टीव्ह स्मिथने लॅबुशेनसह सामना संपवला. स्मिथ चार धावा करून नाबाद राहिला. या सामन्यात आमिर जमालने पाकिस्तानकडून पहिल्या डावात सहा विकेट घेतल्या होत्या. त्याने फलंदाजीतही हात दाखवला. जमालने पहिल्या डावात 82 आणि दुसऱ्या डावात 18 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे त्याने सामन्यात एकूण 100 धावा केल्या आणि सहा विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

लॅबुशेनने दोन्ही डावात झळकावली अर्धशतके

तत्पूर्वी, पाकिस्तानकडून पहिल्या डावात मोहम्मद रिझवानने 88 आणि आमिर जमालने 82 धावा केल्या. आगा सलमानने ५३ धावांचे योगदान दिले होते. तर ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीमध्ये पॅट कमिन्सने पाच विकेट घेतल्या. फलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात लॅबुशेनने 60 आणि मिचेल मार्शने 54 धावा केल्या. आमिरने सहा विकेट घेतल्या. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात फक्त चार फलंदाज दुहेरी धावा करू शकले. पदार्पण कसोटी खेळणाऱ्या सॅम अयुबने 33, रिझवानने 28, बाबर आझमने 23 आणि आमिरने 18 धावा केल्या. जोश हेझलवूडने चार आणि नॅथन लायनने तीन बळी घेतले. (AUS vs PAK)

बाबर फेल तर, वॉर्नर सुसाट

पाकिस्तानचा स्टार फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबर आझमने तीन कसोटी सामन्यांमध्ये सुमार कामगिरी केली. त्याने सहा डावांत २१ च्या सरासरीने केवळ १२६ केल्या. त्याला एकाही सामन्यात अर्धशतकी खेळी करता आली नाही. त्याच वेळी, डेव्हिड वॉर्नरने त्याच्या शेवटच्या मालिकेत सहा डावात 49.83 च्या सरासरीने 299 धावा केल्या. या मालिकेत शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज होता. वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 111 सामन्यात 44.59 च्या सरासरीने 8695 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 26 शतके आणि 36 अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील 161 सामन्यांमध्ये त्याने 45.01 च्या सरासरीने 6932 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 22 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news