

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची एक कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मल्लीनाथ अन्नाप्पा सुतार (रा. शिंगडगाव, वळसंग, जि. सोलापूर), प्रतीक प्रभाकर शिंदे, किशोर नवनाथ शिंदे (दोघे रा. मेंढापूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी गु्न्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आरोपी सुतार, शिंदे यांच्या ओळखीची आहे. आरोपींनी महिलेला शेअर बाजाराची माहिती दिली.
तिला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितले. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवनू आरोपींनी महिलेला बँकेकडून कर्ज काढण्यास सांगितले. आरोपींनी दाखविलेल्या आमिषास महिला बळी पडली. महिलेने वेगवेगळ्या बँकांकडून एक कोटी 66 लाख रुपयांचे कर्ज काढले. आरोपींना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी पैसे दिले. पैसे गुंतविल्यानंतर आरोपींनी महिलेला परतावा दिला नाही. महिलेने गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्यास सांगितले, तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसंकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.
हेही वाचा