औरंगाबाद : बसच्या खिडकीतून डोकावणाऱ्या विद्यार्थ्याचं डोके गेटवर आदळून मृत्यू

औरंगाबाद : बसच्या खिडकीतून डोकावणाऱ्या विद्यार्थ्याचं डोके गेटवर आदळून मृत्यू

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : शाळा सुटल्यावर स्मार्ट सिटी बसमधून घरी जाणाऱ्या नववीतील विद्यार्थ्याचा डोके खांबावर आदळून मृत्यू झाल्याची घटना घडली. बसच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहताना या विद्यार्थ्याचे डोके जिल्हा परिषद मैदानाच्या लोखंडी गेटवर आदळले. यात डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १०) दुपारी १२ च्या सुमारास औरंगपुरा येथे घडली. हरिओम राधाकृष्ण पंडित (रा. बजाजनगर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नववीच्या वर्गात शिकत होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, हरिओम हा नियमित शहर बसने बजाजनगर येथून शाळेत जातो. सोमवारी सकाळी सात वाजता तो शाळेत आला. दुपारी १२ वाजता शाळा सुटली. बाहेर येताच त्याला साजापूर- औरंगपुरा बस (क्र. एमएच २०, ईजी ९८६२) दिसली. त्याला वाटले हीच बस बजाजनगरला जाईल. मात्र, चालक वाहक यांची ड्युटी संपली होती. त्यामुळे चालक कपिल लोखंडे हे जिल्हा परिषद मैदानावरून बस वळवून आणून स्टँडवर उभी करणार होते. दरम्यान, जिल्हा परिषद मैदानात जाताना हरिओमने खिडकीतून डोके बाहेर काढले. गेटमधून जाताना त्याचे डोके लोखंडी गेटवर आदळले. जबर मार लागल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला.
होमगार्ड-रिक्षा चालक महिला धावली मदतीला

हरिओम चा अपघात झाला, तेव्हा एक होमगार्ड असलेली रिक्षा चालक महिला तेथे होती. त्यांनी हरिओमला तत्काळ उचलून घाटीत नेले. बस चालक कपिल लोखंडे हेही मदतीला आले. मात्र, डॉक्टरांनी हरिओमला मृत घोषित केले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news