रेहकुरी अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण ; हरीण, काळवीट अन् अन्य वन्य प्राण्यांसह दुर्मिळ वनस्पतींसाठी प्रसिद्ध | पुढारी

रेहकुरी अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण ; हरीण, काळवीट अन् अन्य वन्य प्राण्यांसह दुर्मिळ वनस्पतींसाठी प्रसिद्ध

गणेश जेवरे : 

कर्जत : तालुक्यातील रेहकुरी हे राज्यातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. या ठिकाणी देश आणि विदेशातून पर्यटक येतात. हरीण, काळवीट, कोल्हा, लांडगा यासह अनेक वन्य प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती येथे आहेत. 117 हेक्टर कार्यक्षेत्र असलेले हे अभयारण्य सन 1980 साली राज्यातील पहिले अभयारण्य म्हणून घोषित झाले. पुणे वन्यजीव विभाग कार्यालयाच्या नियंत्रणाखाली या अभयारण्यची देखभाल होत आहे. हे अभयारण्य हरीण व काळवीट यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये आणि मध्य भारतातील प्राचिन दगडी चित्रात काळवीट प्राण्याचे अस्तित्व आढळून आले. राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने 2015 या वर्षी वन्यजीव सर्वेक्षण झाले. यामध्ये या अभयारण्यात काळविटांची संख्या 450 ते 500 असल्याचे आढळून आले. काळविटांची संख्या जास्त असल्याने आणि जंगलाचा आकार अतिशय लहान असल्याने येथे पर्यटकांना काळवीट जवळून पाहायला मिळतात.

आढळणारे प्राणी
या अभयारण्यात काळवीट हा प्राणी प्रसिद्ध असला तरी, येथे लांडगा, कोल्हा, चिंकारा, तरस, साळींदर, मुंगूस, खोकड हे वन्य प्राणी, तर नाग, साप, अजगर, सरडे, घोरपड हे सरपटणारे प्राणी बघायला मिळतात. या अभयारण्यामध्ये मोर, तितर, लावा, सातभाई, घार, सुतार, चांडोल, भारद्वाज हे पक्षीही आढळतात.

माहिती कक्ष
पर्यटकांसाठी अभयारण्यातर्फे माहिती कक्ष तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये या अभयारण्याची सर्व माहिती देण्यात येते. याशिवाय विद्यार्थ्यांना प्राणी पाहण्यासाठी सभागृह बांधण्यात आलेले आहे. 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहानिमित्त येथे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने येथे भेट दिली. अभयारण्यात सध्या महेंद्रकुमार पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असून, वन परिमंडळ अधिकारी म्हणून अनिल खराटे, वनरक्षक नीलेश जाधव, वनरक्षक साळवे काम पाहत आहेत.

अभयारण्यातील वनस्पती
जंगल म्हटले की आपल्यासमोर घनदाट झाडी, मोठमोठे वृक्ष असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, रेहकुरी अभयारण्य हे वेगळ्या वनस्पतींचे अभयारण्य म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी असणारी झाडी ही झुडपांसारखी आहेत. यामुळे शुष्क काटेरी वने या प्रकारात हा परिसर मोडतो. या ठिकाणचा बहुसंख्य भूभाग हा गवताळ आहे. येथे खैर, बाभूळ, तरवड, बोर, कडूनिंब ही झाडे या जंगलात आढळतात. तर, मारवेल, पाहुण्या, फुली, शेंड्या डोंगरी या गवती वनस्पती अभयारण्यात प्रामुख्याने दिसतात.

Back to top button