Thackeray vs Shinde : ठाकरे-शिंदे गटांकडून पक्षाचे नाव आणि चिन्हांची निवड निवडणूक आयोगाकडे सादर | पुढारी

Thackeray vs Shinde : ठाकरे-शिंदे गटांकडून पक्षाचे नाव आणि चिन्हांची निवड निवडणूक आयोगाकडे सादर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Thackeray vs Shinde : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वकिलांनी आज भारताच्या निवडणूक आयोगाकडे पक्षाची नावे आणि चिन्हांची निवड सादर केली.

दरम्यान, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे तसेच ठाकरे गटाने शिवसेना पक्षावर तसेच धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर दावा सांगितला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने अलिकडेच पक्षाचे नाव व चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही गटांना नवीन नावे व चिन्ह सुचविण्याचे निर्देशही आयोगाने दिले होते. पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठविण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत ठाकरे गटाने यावर दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. आम्ही जी कागदपत्रे आणि पुरावे पाठविले होते, त्याची पडताळणी न करताच आयोगाने नाव व चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. या मुद्यावर आजच सुनावणी घेऊन निकाल दिला जावा, असे ठाकरे गटाने याचिकेत म्हटले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व निर्णय घाईघाईत घेतले. याबाबतचा तपशील आम्ही याचिकेत दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून आम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे, असे ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी यासंदर्भात सांगितले.

Back to top button