पुणे : जूनपाठोपाठ यंदाचा ऑगस्ट महिनादेखील गत १२३ वर्षांतील सर्वात कोरडा महिना ठरणार आहे. संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्याच्या २३ दिवसांत फक्त ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याआधी सर्वात कमी पाऊस ऑगस्ट २००५ मध्ये १९०.१ मिलिमीटर इतक्या सर्वात कमी पावसाची नोंद होती. तो विक्रम २०२३ च्या ऑगस्ट मोडीत काढला आहे. गत दीडशे वर्षात सहावेळा भारतात अल निनो सक्रिय होता. त्यात पाचवेळा भारताला दुष्काळाचा सामना करावा लागला आहे.
इंग्लंड येथील युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक सायन्समध्ये हवामान शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे भारतीय वंशाचे शास्त्र डॉ. अक्षय देवरस यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार अल निनोचा सर्वाधिक फटका भारताला जूननंतर ऑगस्ट महिन्यात बसला असून, तो गत १२३ वर्षांतला नीचांक आहे. जूनमध्ये १२२ वर्षांतला नीचांकी पाऊस बरसला.
मान्सूनचा आस बदलला देवरस यांच्या संशोधनानुसार, भारतात मान्सूनचा आस (ट्रफ) सतत मध्य भारतावर असतो. पण यंदा तो सतत उत्तर भारतावर राहिला आहे. कोअर मान्सून झोन यंदा मध्य भारताकडून उत्तरेकडे सरकल्याने हा मोठा बदल यंदाच्या मान्सूनचे वैशिष्ट्य आहे. मान्सून जुलैमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर होतो. तेव्हा देशभर मुसळधार व एकसारखा पाऊस पडतो. पण यंदा ही स्थिती खूप उशिरा तयार झाली. मान्सून ७ ते १८ ऑगस्ट दरम्यान हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर झाला. पुन्हा २१ ऑगस्टपासून उत्तरेकडे स्थिर झाला. कमी दाबाची प्रणाली आता निघून गेल्याने मान्सून पुन्हा ब्रेकिंग अवस्थेत आहे, असेही देवरस यांनी आपल्या संशोधनात स्पष्ट केले.
हेही वाचा