विट्यात भरवस्तीत सशस्त्र दरोडा; सोने-चांदीसह दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

विट्यात भरवस्तीत सशस्त्र दरोडा; सोने-चांदीसह दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

विटा : पुढारी वृत्तसेवा : विट्यात साळशिंगे रस्त्यावरील एका बंगल्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. यात दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यासह रोख सुमारे १ लाख ४५ हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना आज गुरुवारी (दि.२५) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. त्यामुळे शहर आणि परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, विटा पोलिसांनी तात्काळ श्वानपथक मागवून तपास सुरू केला आहे. शिवाय तात्काळ पोलीस पथकेही रवाना करण्यात आली आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, विटा येथील धान्य व्यापारी रामचंद्र प्रकाश गिड्डे (वय ३०) यांचे दुकान मायणी रस्त्यालगत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तर त्यांचा बंगला येथील साळशिंगे रस्त्यालगत भरवस्तीत आहे. पहाटे साडेतीन वाजल्यानंतर गिड्डे कुटुंबीय झोपेत असताना चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी कटावणीने कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, यादरम्यान गिड्डे कुटुंबियाना याबाबतची चाहूल लागताच ते झोपेतून जागे झाले.

त्यांना घरात अज्ञात व्यक्ती शिरून चोरीचा प्रयत्न करत असल्याचे समजले. यानंतर आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच गिड्डे, त्यांची पत्नी व मुलांना अज्ञातांनी तलवारी आणि चाकूचा धाक दाखवून २९ हजार रुपये रोख रकमेसह सोने- चांदीचे दागिने असा एकूण सुमारे १ लाख ४५ हजार ७५० रूपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.

त्यानंतर काही वेळातच या घटनेची माहिती त्यांनी विटा पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक पांडूरंग कण्हेरे यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. भरवस्तीत असा प्रकार घडल्याने पोलीसही चक्रावले आहेत. दरम्यान दुपारी सांगलीहून एक श्वानपथक पाचारण करण्यात आले. तसेच हस्त सामुद्रिक पथकही बोलावण्यात आले असून कसून तपास सुरू आहे. पुढील तपास विटा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news