सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : नई जिंदगी येथील नागरी आरोग्य केंद्रात कोविडची लस न देताच लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले जात असल्याचा अजब प्रकार समोर आला. यामध्ये पहिल्या डोसच्या प्रमाणपत्रासाठी इरफान शेख यांना तीनशे रूपये मोजावे लागल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे या गैरप्रकाराकडे आयुक्त काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरात लसीकरण न करताच लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले जात असल्याची अफवा पसरली होती. परंतु, आता ही अफवा नसून सत्यता असल्याची बाब समोर आली आहे. नई जिंदगी येथील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या पहिल्या डोसच्या प्रमाणपत्रासाठी तीनशे व दुसर्या प्रमाणपत्रासाठी हजार ते दीड हजार रूपये मोजावे लागत आहे. या बाबीची खातरजमा करण्यासाठी इरफान शेख यांनी नई जिंदगी येथील नागरी आरोग्य केंद्रात जाऊन पैसे देऊन लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी या आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचार्यांकडून शहानवाज नबीलाल शेख यांच्यामार्फत हे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे शेख यांनी सांगितले. येथे दररोज अशा गैरप्रकारे कोविड लसीकरण प्रमाणपत्रांची खिरापत अवघ्या तीनशे रूपयांमध्ये वाटप केली जात असल्याने महापालिका प्रशासन काय करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरणाचे दोन डोस असल्याशिवाय पेट्रोल पंप, मॉल, शासकीय कार्यालयासह अन्य ठिकाणी प्रवेश नाकारला आहे. जेणेकरून नागरिकांनी लसीकरणाचे दोन डोस तत्काळ घ्यावे. परंतु, दुसरीकडे महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात असा गैरप्रकार सुरू असल्याने खळबळ माजली आहे.
भविष्यात ओमायक्रॉनचे रूग्ण वाढल्यास ही खोटी प्रमाणपत्रे त्याला जबाबदार असणार आहेत. त्यामुळे संबंधितांवर आयुक्त काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही, तर नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा याविरोधात आवाज उठवणार असल्याचे सांगितले.
शहानवाज नबीलाल शेख हा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यामार्फत येथे बोगस प्रमाणपत्र मिळवून देण्यात येत असून डॉक्टर, नर्स यांचा संबंध आहे. मोठा आर्थिक व्यवहार होत आहे. याविरोधात मी मनपा आयुक्तांकडे तक्रार देण्यास गेलो होतो. परंतु, याची दखल घेतली नाही.
– इरफान शेख (तक्रारदार, सोलापूर)
हेही वाचलंत का?