सूर्यापेक्षाही अधिक उष्‍णता निर्माण करण्याचा महाप्रयोग ‘या’ ठिकाणी सुरू.. | पुढारी

सूर्यापेक्षाही अधिक उष्‍णता निर्माण करण्याचा महाप्रयोग 'या' ठिकाणी सुरू..

लंडन : संशोधकांनी आता पृथ्वीवरच सूर्यापेक्षाही अधिक उष्णता निर्माण करण्याची तयारी केली आहे. दक्षिण इंग्लंडमधील एका ठिकाणी यासाठी न्यूक्लिअर फ्युजनचा प्रयोग केला जाणार आहे. त्याठिकाणी एका छोट्याशा खोलीत 5 कोटी अंश सेल्सिअसच्या तापमानाची निर्मिती केली जाणार आहे. ही उष्णता सूर्याच्या उष्णतेपेक्षा दुप्पटीने अधिक आहे.

या महाप्रयोगासाठी वैज्ञानिक गेल्या अनेक दशकांपासून प्रतीक्षा करीत आहेत. बि—टनच्या ऑक्सफर्डशायर परिसरात हा महाप्रयोग केला जाणार आहे. त्यावेळी न्यूक्लिअर फ्युजनच्या प्रक्रियेमधून मोठ्या प्रमाणात लो कार्बन एनर्जी निर्माण केली जाईल.

वैज्ञानिक गेल्या अनेक दशकांपासून असे करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांना यश मिळालेले नाही. आता डिडकोट परिसरातील एक खासगी कंपनी ‘टोकामॅक एनर्जी’ आपल्या न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरला 5 कोटी अंश सेल्सिअसपर्यंत फायर करण्याची तयारी करीत आहे.

संशोधकांचे एक पथक यावेळी हायड्रोजनच्या अणूंना एक करण्यासाठी दाब देईल ज्यामधून हेलियम निर्माण होईल. हे नाभिकीय संलयन बळ सूर्याला ऊर्जा देणार्‍या बळाइतकेच आहे. या महाप्रयोगानंतर येथून स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा मिळू शकेल. ही प्रक्रिया टोकामॅक डिव्हाईसमध्ये केली जाईल.

त्याच्या आत शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र बनवलेले आहे. त्यामुळे फिरत असलेला हायड्रोजन वायू रोखला जाईल. जर या फ्युजन रिअ‍ॅक्टरच्या आत काही गडबड झाली तर उपकरण आपोआपच बंद होईल. त्यामुळे आतील खगोलीय उष्णता बाहेर पडण्याचा धोका नाही.

Back to top button