एकनाथ शिंदे लवकरात लवकर आसाम सोडा, स्थानिक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा इशारा

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

गुवाहाटी; पुढारी ऑनलाईन : आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर आसाम सोडण्यास सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे ५० समर्थक आमदारांचा सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम आहे. हॉटेल परिसरातून मीडिया कव्हरेज सुरु असून एकप्रकारे गोंधळ निर्माण झाला आहे. याचा आसामच्या लोकांना त्रास होत आहे. तसेच यामुळे राज्याची बदनामी होत आहे. त्यात सध्या आसाममध्ये गंभीर पूरस्थिती आहे. लोकांना पुरेशी मदत मिळत नसून त्यांची गैरसोस होत आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत आसाम सरकार तुमची अलिशान बडदास्त ठेवत आहे. नैसर्गिक आपत्तीत हे बरोबर नाही. त्यासाठी आसाममधील परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही लवकरात लवकर आसाम सोडावे, असे भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

शिवसेना आमदार एकदा मुंबईत आले की, त्यातील काहीतरी आमदार शिंदे यांची साथ सोडतील, अशी शिवसेनाच नाही तर शरद पवार यांनाही खात्री आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी 'आधी मुंबईत या, मग महाविकास आघाडीतून बाहेर पडू' असा निरोप दिला आहे. शिंदेंच्या गोटातील 20 ते 21 आमदार संपर्कात असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आमदार राज्यात परतल्यानंतर या सत्तानाट्याला वेगळी कलाटणी देता येईल, असे शरद पवार आणि मविआच्या नेत्यांना वाटत आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेचे 37 आमदार झाले असून या आमदारांच्या सहीचे पत्र राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांना (शुक्रवारी) दिले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिंदे गटाच्या आमदारांनी गुरुवारी दिली होती. नवा गट स्थापन करून भाजपबरोबर शिंदे गट जाणार आहे; तर शिवसेनेकडे 17 आमदार राहणार आहेत. शिवसेना म्हणून गट स्थापन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांचे पत्र लागत असल्याने शिंदे गटाने विधानसभेत वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी किणीकर यांनीही या म्हणण्याला दुजोरा दिला. मात्र केवळ वेगळा गट स्थापन करण्याच्या या हालचाली होणार असतील तर त्या कायद्याच्या गुंतागुंतीत सापडू शकतात, असे जाणकारांना वाटते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news