पुढारी ऑनलाईन डेस्क: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकच्या सुपर ४ सामन्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेने नियमात बदल केला आहे. १० सप्टेंबर २०२३ रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार्या या सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना प्रतिकूल हवामानामुळे थांबला, तर हा सामना ११ सप्टेंबर रोजी पुढे सुरू राहील. यामुळे प्रेक्षकांनी सामन्याची तिकिटे त्यांच्याकडे ठेवावीत. कारण ही तिकीटे राखीव दिवशी खेळवलेल्या सामन्यासाठी वैध राहतील. याचाच अर्थ १० तारखीची तिकिटे ११ तारखेला होणाऱ्या सामन्यासाठी चालतील, असे आशियाई क्रिकेट परिषदेने म्हटले आहे.
आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत रविवारी ( दि. 10) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा स्पर्धेतील दुसरा सामना असेल. यापूर्वी 2 सप्टेंबर रोजी गट फेरीत पावसामुळे सामना रद्द करण्यात आला होता. भारतीय संघाला फलंदाजीची संधी मिळाली होती. मात्र, पावसामुळे पाकिस्तानच्या डावाची सुरुवातही होऊ शकली नाही. आता रविवारीच्या सामान्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. कोलंबोमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यातून सामन्यांचे यजमानपद काढून घेण्याचीही चर्चा होती. हे सामने हंबनटोटा किंवा दांबुला येथे हलवले जातील, असे बोलले जात होते. परंतु तसे झाले नाही. आता आशिया चषकाचे उर्वरित सर्व सामने येथे खेळवले जातील.
कोलंबोमधील हवामान स्वच्छ नाही. टीम इंडियाने गुरुवारी ( दि. 7) इनडोअर स्टेडियममध्ये सराव केला. संघाला मैदानात उतरता आले नाही. खराब हवामानामुळे संघांच्या तयारीवर परिणाम होत आहे. रविवारीही भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा या स्पर्धेतील दोन्ही संघांमधील सामना पावसाने थांबल्यास आशियाई क्रिकेट परिषदेने नियमात बदल केला आहे. हा सामना दुसऱ्या दिवशी होणार आहे.