Asia Cup 2023 : ‘नाबाद’ विजयाने लाज ‘आबाद’ | पुढारी

Asia Cup 2023 : ‘नाबाद’ विजयाने लाज ‘आबाद’

पाल्लेक्केल, वृत्तसंस्था : आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात भारताने ‘नाबाद’ विजय मिळवला. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकांत 230 धावा केल्या होत्या; परंतु पावसामुळे भारताला 23 षटकांत 145 धावा करण्याचे टार्गेट मिळाले. हे लक्ष्य भारताने 17 चेंडू आणि 10 विकेटस् शिल्लक ठेवून गाठले. भारताची सलामी जोडी विजयाची शिल्पकार ठरली. रोहित शर्मा (74) आणि शुभमन गिल (67) यांनी अर्धशतके झळकावून भारताला नाबाद विजय मिळवून दिला. वरकरणी भारताचा हा विजय सहज मिळाला असे वाटत असले तरी आधी झालेल्या डावात नेपाळी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा उघड्या पाडल्या. हा सामना भारताने जिंकला असला तरी नेपाळने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली.

230 धावांचे लक्ष्य घेऊन भारतीय सलामीवीर मैदानात उतरले. नेपाळचा वेगवान गोलंदाज करण के. सी. याने रोहित शर्माला पहिल्या सहा चेेंडूंत चार वेळा चकवले. पहिल्या षटकात रोहितला खाते उघडता आले नाही. दुसर्‍या षटकांत शुभमन गिलने तीन चौकार ठोकून रोहितवरील दडपण थोडे कमी केले, पण 2.1 षटकानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. यात जवळपास दोन तासांचा खेळ वाया गेला. यामुळे भारताच्या डावातील षटके कमी करण्यात आली. विजयासाठी भारताला 23 षटकांत 145 धावांचे टार्गेट मिळाले. पावसाच्या ब्रेकनंतर सलामी जोडीने कात टाकली. रोहित आणि शुभमन यांनी टी-20 स्टाईल आक्रमक फलंदाजी सुरू केली. 47 चेंडूंत संघाचे अर्धशतक फलकावर लागले. रोहित शर्माने नेपाळी गोलंदाजीचा समाचार घेत 39 चेंडूंत अर्धशतक गाठले. दोघांनी 82 चेंडूंत शतकी भागीदारी साकारली. त्यानंतर शुभमन गिलनेही अर्धशतक साजरे केले यासाठी त्याने 47 चेंडू खेळले.

भारतीय सलामीवीरांच्या धडाकेबाज खेळीने विजयी लक्ष्य नेहमीच आवाक्यात राहिले होते. शेवटी 20.1 षटकांत शुभमन गिलने चौकार ठोकून विजयी टार्गेट पूर्ण केले. (Asia Cup 2023)

तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या नेपाळला सहज गुंडाळू, असा विश्वास असलेल्या भारताला नेपाळने चांगलेच झुंजवले. भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि स्वैर गोलंदाजीचा फायदा घेत नेपाळने भारताविरुद्ध तब्बल 48.2 षटके खेळून 230 धावा केल्या. नेपाळच्या असिफ शेखने (58) अर्धशतक झळकावले, तर सोमपाल कामीचे (48) हुकले.

भारतीय खेळाडूंनी पहिल्या 5 षटकांत 3 झेल सोडले. कुशल भुर्तेल (38) आणि आसिफ शेख यांनी 65 धावांची भागीदारी केली; परंतु शार्दूल ठाकूरने ही जोडी तोडली. रवींद्र जडेजाने फिरकीच्या तालावर नेपाळला नाचवले आणि 3 विकेटस् घेतल्या. भीम शार्की (7), नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल (5) आणि कुशल मल्ला (2) यांची विकेट त्याने घेतली. आसिफने अर्धशतकी खेळी करून नेपाळचा गड सांभाळला. गुलशन झा याचे फटके पाहण्यासारखे होते. मोहम्मद सिराजला त्याने मारलेला अपर कट, त्यानंतर यष्टिरक्षक-स्लीपमधून लेट कट मारून मिळवलेला चौकार पाहून सर्वांनी कौतुक केले. मोहम्मद सिराजने नेपाळचा सलामीवीर आसिफला 97 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने 58 धावांवर झेलबाद केले.

पुढच्या षटकात त्याने गुलशनची (23) विकेट मिळवून दिली. नेपाळला 144 धावांवर सहावा धक्का बसला. पावसामुळे 37.5 षटकांत सामना थांबवण्यात आला यावेळी नेपाळच्या 6 बाद 178 धावा झाल्या होत्या. विरोधी संघाचे शेपूट भारताला नेहमी दमवते. नेपाळही त्याला अपवाद ठरला नाही. दीपेंद्रसिंग ऐरी आणि सोमपाल कामी यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना उघडे पाडले. हार्दिकने ही भागीदारी तोडली. दीपेंद्र 25 चेंडूंत 29 धावांवर पायचीत झाला. पण, सोमपाल चांगलाच पेटला होता आणि त्याने 56 चेंडूंत 48 धावा चोपल्या. नेपाळने 10 बाद 230 धावा केल्या. सिराजने 3 विकेटस् घेतल्या.

रवींद्र जडेजाने 40 धावांत 3 विकेटस् घेतल्या आणि आशिया चषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक 22 विकेटस् घेणार्‍या इरफान पठाणच्या विक्रमाशी बरोबरी केली.

Back to top button