पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कपच्या सहाव्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तान विरुद्ध प्रथम फलंदाजी करत 8 बाद 291 धावा केल्या. यासह अफगानिस्तानला विजयासाठी 292 धावांचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक 92 तर पथुम निसांकाने 41 धावांची खेळी केली. अफगाण संघाकडून गुलबदिन नायब हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 60 धावा देत 4 बळी घेतले.
दिमुथ करुणारत्ने आणि पाथुम निसांका यांनी अर्धशतकी भागीदारी केल्याने श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. डावाच्या 11व्या षटकात 63 धावांच्या सांघिक धावसंख्येसह करुणारत्ने बाद झाला आणि ही सलामीची जोडी फुटली. करुणारत्ने याने 35 चेंडूत 32 धावांची खेळी केली. यानंतर 40 चेंडूत 41 धावांची खेळी करून निसांकाही बाद झाला. सदीरा समरविक्रमा 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 86 धावांपर्यंत श्रीलंकेने 3 विकेट गमावल्या होत्या.
क्रमांक-3 वर फलंदाजीला आलेल्या मेंडिसने सावध फलंदाजी करत 55 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, त्याने अनुभवी गोलंदाज रशीद खानच्या एका षटकात सलग 3 चौकार मारले. तसेच आपल्या डावात त्याने चरित अस्लंका (36) सोबत चौथ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली. पण मेंडिस धावबाद झाला आणि त्याचे शतक हुकले. मेंडिसने 84 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 92 धावांची खेळी साकारली.
188 धावांवर श्रीलंकेने चौथी विकेट गमावली. यानंतर अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि एकापाठोपाठ लंकन खेळाडूंना तंबूत पाठवले. एकेकाळी त्यामुळे मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणा-या श्रीलंकेच्या संघाची अवस्था 39.3 षटकांत 7 बाद 227 अशी झाली. विशेष म्हणजे श्रीलंकेने अवघ्या 7 षटकांत 4 विकेट गमावल्या. खालच्या क्रमवारीत, ड्युनिथ वेलगे (33*) आणि महेश तिक्शिना (28) यांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले.
अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानने 6 च्या इकॉनॉमी रेटने 60 धावा देत 1 यश मिळविले. मोहम्मद नबीने 10 षटकात एकही विकेट न घेता 35 धावा दिल्या. फजलहक फारुकीने 7 षटके टाकली आणि 52 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. रशीदने 63 धावा देताना 2 बळी घेतले. करीम जनातने 3 षटकात 20 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही.
सुपर-4 फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला 292 धावांचे लक्ष्य 37.1 षटकांत गाठावे लागेल. त्यात ते अपयशी ठरले, तर श्रीलंका ग्रुप-बीमधून सुपर-4 मध्ये पोहोचेल. या गटातून बांगलादेशने आधीच पुढची फेरी गाठली आहे.