Ashes 2023 : ‘बॅझबॉल’ची अग्निपरीक्षा! बेन स्टोक्सवर इंग्लंडच्या विजयाची मदार

Ashes 2023 : ‘बॅझबॉल’ची अग्निपरीक्षा! बेन स्टोक्सवर इंग्लंडच्या विजयाची मदार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashes 2023 : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज (रविवार, 2 जुलै) शेवटचा दिवस आहे. लॉर्ड्सवर सुरू असलेल्या या सामन्याच्या शेवटच्या दिवशी बरेच काही घडण्याची शक्यता आहे.

रोमांचक झालेल्या लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडवर आपली पकड घट्ट केली. चौथ्या डावात इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून विजयासाठी 371 धावांचे लक्ष्य मिळाले असून त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंड संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केवळ 114 धावांपर्यंत मजल मारली, पण त्यांचे चार फलंदाज तंबूत पाठवण्यात कांगारू यशस्वी झाले. अशा परिस्थितीत सामना वाचवायचा असेल इंग्लंडला ऑलआऊट न होता 257 धावा कराव्या लागणार आहेत. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या 6 फलंदाजांची शिकार करावी लागणार आहे. (Ashes 2023)

इंग्लंडसाठी शेवटच्या दिवसाच्या खेळात बेन डकेट आणि कर्णधार बेन स्टोक्स डावाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा डकेटने नाबाद 50 आणि स्टोक्सने नाबाद 29 धावा केल्या होत्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन बळी घेत इंग्लिश संघाला घाम फोडण्याचे काम केले. (Ashes 2023)

एकंदरीत लॉर्ड्स कसोटीतही कांगारू संघाने पुन्हा एकदा इंग्लंडच्या 'बॅझबॉल' शैलीची धुळधाण उडवल्याचे चित्र आहे. यजमान इंग्लंडला शेवटच्या दिवशी किमान 90 षटके खेळायची असून ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 6 विकेट्सची गरज आहे. दुसरीकडे स्टोक्सच्या संघाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची असेल तर त्याला मॅरेथॉन खेळी करून 257 धावांचा टप्पा पार करावा लागणार आहे.

लायन मैदानात उतरणार नाही (Ashes 2023)

ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिकोनातून वाईट गोष्ट अशी आहे की त्यांच्या संघाचा प्रमुख ऑफस्पिनर नॅथन लायन मैदानात उतरणार नाही. अशा स्थितीत त्याच्या फिरकीची कमतरता भासणार आहे. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ पार्ट टाईम गोलंदाजी करू शकतात, पण त्यांच्यावर इंग्लंडचे फलंदाज आक्रमण जोरदार आक्रमण करू शकतात. अशा स्थितीत कांगारूंना केवळ वेगवान गोलंदाजांच्या जोरावरच इंग्लंडची फलंदाजी उद्ध्वस्त करावी लागणार आहे.

लॉर्ड्स कसोटीत आतापर्यंत काय घडले?

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने शानदार शतक झळकावले. त्याने 184 चेंडूत 110 धावा केल्या. याशिवाय सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 88 चेंडूत 66 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सन आणि जोश टोंगू यांनी 3-3 बळी घेतले. तर रूटने 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. याशिवाय जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला 1-1 असे यश मिळाले.

इंग्लंडने पहिल्या डावात 325 धावा केल्या

इंग्लंडचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेटने सर्वाधिक 98 धावांची खेळी खेळली. तर हॅरी ब्रूकने 50 धावा केल्या. याशिवाय जॅक क्रॉलीने 48 धावांचे योगदान दिले. 63 चेंडूत 42 धावा करून ओली पोप कॅमेरून ग्रीनचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडला 2-2 यश मिळाले. याशिवाय पॅट कमिन्स, नॅथन लायन आणि कॅमेरून ग्रीन यांनी 1-1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 279 धावांवर आटोपला

ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात सलामीवीर उस्मान ख्वाजाने 187 चेंडूत सर्वाधिक 77 धावा केल्या. तर मार्नस लबुशेनने 51 चेंडूत 30 धावांची खेळी केली. याशिवाय स्टीव्ह स्मिथने 62 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक 4 बळी घेतले. जोश टंग आणि ओली रॉबिन्सन यांना 2-2 यश मिळाले. तर जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्सने 1-1 विकेट घेतली.

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला होता. अशाप्रकारे कांगारू संघ 5 कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता लॉर्ड्स कसोटी जिंकून पॅट कमिन्सचा संघ 2-0 अशी आघाडी मिळवण्याच्या तयारीत आहे. तर यजमान इंग्लंडला मालिकेत पुनरागमन करायचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news