West Indies ‘OUT’ : विंडीज क्रिकेटसाठी काळा दिन! भारतातील विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न धुळीस | पुढारी

West Indies 'OUT' : विंडीज क्रिकेटसाठी काळा दिन! भारतातील विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न धुळीस

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : West Indies ‘OUT’ : वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी शनिवारचा दिवस काळा दिन ठरला. कारण, पहिले दोन वन-डे विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघ आता आयसीसी वर्ल्डकप 2023 मधून बाहेर पडला आहे. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत वेस्ट इंडिजचा स्कॉटलंडने पराभव केला आणि त्यामुळे भारतातील विश्वचषकात खेळण्याचे त्यांचे स्वप्न आता धुळीस मिळाले आहे. वेस्ट इंडिजच्या संघावर ही नामुष्की पहिल्यांदाच ओढवली आहे.

विश्वचषकासाठी पात्रता फेरी सुरू आहे. या फेरीत वेस्ट इंडिजला यापूर्वी झिम्बाब्वेच्या संघाने मोठा धक्का दिला होता; पण आता तर क्रिकेट विश्वात लिंबू-टिंबू समजल्या जाणार्‍या स्कॉटलंडने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे आणि या पराभवानंतर ते आता भारतामधील होणार्‍या वन-डे विश्वचषकात खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. (West Indies ‘OUT’)

स्कॉटलंडविरुद्धच्या या सामन्यात वेस्ट इंडिजची प्रथम फलंदाजी होती. या सामन्यात वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. कारण, त्यांचा अर्धा संघ फक्त 60 धावांत गारद झाला होता; पण त्यानंतर जेसन होल्डरने 45 धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच त्यांना 181 धावांपर्यंत मजल मारता आली; पण त्यानंतर स्कॉटलंडने मात्र सात विकेटस् राखत हा सामना सहज जिंकला आणि त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ हा भारतातील विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोनवेळचा विश्वविजेता स्पर्धेबाहेर राहणार (West Indies ‘OUT’)

वेस्ट इंडिजने 1975 मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात बाजी मारली होती. त्यानंतर 1979 मध्ये झालेल्या दुसर्‍या विश्वचषकातही त्यांनी जेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्यांना विश्वविजयाची हॅट्ट्रिक साधण्याची चांगली संधी होती; पण 1983 मध्ये झालेल्या विश्वचषकात भारताने त्यांचा अंतिम फेरीत पराभव केला आणि त्यांची ही हॅट्ट्रिक पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर मात्र वेस्ट इंडिजच्या संघाला आतापर्यंत एकही वन-डे विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे या विश्वचषकात त्यांची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते; पण आता तर त्यांना भारतामधील विश्वचषकातच खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button