Ashes 2023 : बेन स्टोक्स लढला, पण इंग्लंड हरला

Ashes 2023 : बेन स्टोक्स लढला, पण इंग्लंड हरला
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्था : कसोटी क्रिकेटमधील शहेनशाह अशी बिरुदावली नुकतीच मिळवलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने अ‍ॅशेस मालिकेतही आपला जलवा कायम ठेवला असून लॉर्डस्वर झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 43 धावांनी हरवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. बेन स्टोक्स या सामन्यात चांगलाच लढला, पण इंग्लंडचा संघ मात्र हरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्याची ही मोठी खेळी व्यर्थ ठरली. जोश हेझलवूडने त्याला 155 धावांवर असताना बाद केले आणि ऑस्ट्रेलियाचा मार्ग सुकर झाला. यापूर्वी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने थरारक विजय साकारला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामनाही जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना 43 धावांनी जिंकला. (Ashes 2023)

ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे आव्हान दिले होते, पण या आव्हानाचा पाठलाग करत असताना इंग्लंडची 4 बाद 45 अशी अवस्था झाली होती. त्यावेळी हा सामना इंग्लंड चौथ्याच दिवशी गमावणार, अशी चर्चा सुरू होती, पण त्याचवेळी इंग्लंडच्या संघासाठी धावून आला तो कर्णधार बेन स्टोक्स. कारण स्टोक्सने यावेळी दीड शतकी खेळी साकारली आणि सामन्याचा नूर पालटला. स्टोक्सला यावेळी चांगली साथ मिळाली ती बेन डकेटची. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. इंग्लंडचा डाव आता सावरतोय असे वाटत होते खरे, पण त्याचवेळी जोश हेझलवूडने इंग्लंडला मोठा धक्का दिला. जोशने यावेळी डकेटला 83 धावांवर बाद केले आणि संघाला मोठी विकेट मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंडचा संघ ढासळेल असे वाटत होते, पण त्यावेळी स्टोक्स हा खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहिला. स्टोक्स यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा चांगला प्रतिकार करत होता, त्यामुळे इंग्लंडचा संघ आता जिंकेल असे वाटत होते, पण तेवढ्यात पुन्हा एकदा या सामन्याला वेगळे वळण मिळाले. हेजलवूडने ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. स्टोक्सवर इंग्लंडच्या विजयाची मदार होती, पण जोशने त्याला बाद केले आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरला. स्टोक्सने यावेळी 9 चौकार आणि 9 षटकारांच्या जोरावर 155 धावांची दमदार खेळी साकारली. (Ashes 2023)

तत्पूर्वी, बेन डकेट (98), हॅरी ब्रूक (50) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने येथील दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्व बाद 325 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या दिवसअखेर 2 बाद 130 धावांपर्यंत मजल मारली होती. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 279 धावांत रोखल्यामुळे त्यांना विजयासाठी 371 धावांचे आव्हान मिळाले. इंग्लंडच्या दुसर्‍या डावाची सुरुवात खराब झाली. झॅक क्राऊली (3) आणि ऑली पोप (3) या दोघांना मिचेल स्टार्कने पहिल्या पाच षटकांतच तंबूत धाडले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 2 बाद 13 अशी झाली. यानंतर जो रूट आणि बेन डकेट यांनी काही काळ किल्ला लढवला; पण ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने इंग्लंडला पुन्हा दोन धक्के दिले. त्याने रूट (18) आणि त्याच्या जागी आलेला हॅरी ब्रूक (4) यांना बाद केले. यावेळी संघाची अवस्था 4 बाद 45 अशी झाली. या चार धक्क्यांनंतर डकेट आणि कर्णधार स्टोक्स यांनी कोणतीही पडझड न होऊ देता दिवसअखेरीस 4 बाद 114 अशी मजल मारली. डकेट (50) आणि स्टोक्स (29) धावांवर खेळत होते, पण पाचव्या दिवशी शेवटी सरसी ऑस्ट्रेलियाची झाली.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news