

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून रविवारी (दि.२) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. दरम्यान, शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदित्य ठाकरे यांनी अजित पवार यांच्या बंडावर प्रतिक्रिया दिली आहे.
आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, आजच्या राजकारणाच्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करतो. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. पण, ज्या गद्दारांना मंत्रिपदाची स्वप्न पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं? असा सवाल त्यांनी शिवसेना आमदारांना विचारला आहे.