

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून रविवारी (दि.२) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांचे सर्वांत मोठे आश्रयदाते आहेत", अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संजय सिंग यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करणार अशी ग्वाही दिली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, आज महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आणि भुजबळांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला, असे सिंग म्हणाले.
आज रविवारी (दि.2) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. अजित पवार यांच्यासह छगन भूजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील अजित पवार यांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती. त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करावे आणि दुसरी जबाबदारी द्यावी, असे म्हटले होते. त्यांनी 1 जुलैपर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता. मात्र, यावर निर्णय न झाल्याने आज अजित पवार यांनी देवगिरी येथे बैठक बोलावली आणि राज्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा मोठा टर्निंग पॉइंट घेतला. आज रविवारी दुपारनंतर मोठ्या वेगाने घडामोडी घडत गेल्या.