पुणे : भारतात बेकायदा प्रवेश करून पुण्यात वास्तव्यास असलेल्या तब्बल 61 बांगलादेशी नागरिकांना मागील दहा वर्षांत पुणे पोलिसांनी पकडले आहे. नुकतेच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार पेठेत केलेल्या कारवाईत 9 पुरुष आणि 10 महिला अशा 19 बांगलादेशींना पकडले. त्यामुळे अवैध पद्धतीने पुण्यात राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित महिलांना दलालांनी कामाचे प्रलोभन दाखवून पुण्यात आणल्यानंतर वेश्याव्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, गुन्ह्यातील शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यासाठी कराव्या लागणार्या कायदेशीर प्रक्रियेला मोठा कालावधी लागतो. त्यामुळे कारागृहातून बाहेर आल्यानंतर या नागरिकांना सांभाळण्याची वेळदेखील पोलिसांवर येते. फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका दाम्पत्याला तर तब्बल तीन महिने पोलिसांनी सांभाळले होते. त्यानंतर त्यांची मायदेशी रवानगी झाली होती.
त्या दाम्पत्याला कामाचे प्रलोभन दाखवून दलालांनी बेकायदा भारतात प्रवेश मिळवून दिला होता. चांगले काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन बांगलादेश येथून अवैध मार्गाने हे दलाल वीस ते पंचवीस हजार रुपयांत बांगलादेशी नागरिकांना भारतात प्रवेश मिळवून देतात. पुढे बनावट कागदपत्रांद्वारे त्यांना मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत आणले जाते. पुण्यात आल्यानंतर महिलेला वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव टाकण्यात येतो. नकार दिल्यानंतर त्या महिलेला पोलिसांत देण्याची भीती दाखवली जाते. त्यामुळे परतीचे मार्गदेखील त्यांचे बंद होतात. शेवटी वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही.
याबाबत एका पोलिस अधिकार्याने सांगितले की, बुधवार पेठेतील 100 ते 120 इमारतींत वेश्याव्यवसाय चालतो. यात 5 ते 6 हजार महिला वेश्याव्यवसाय करतात. या सगळ्या महिला नेपाळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश येथून आल्या आहेत. बांगलादेशातून आलेल्या महिलांची संख्यासुद्धा मोठी आहे. बांगलादेशी दलालांच्या माध्यमातून या महिला सीमा ओलांडतात. यानंतर भारतात आल्यानंतर या महिलांना कोलकाता आणि आजूबाजूच्या शहरातील लॉज, हॉटेलमध्ये ठेवले जाते.
याच काळात या महिलांना खोटी कागदपत्रे देऊन आधार आणि पॅन कार्ड तयार केले जाते. बांगलादेशमधील दलाल ढाका, खुलना आणि इतर ठिकाणच्या गरीब कुटुंबांतील महिलांना दिल्ली आणि मुंबई येथे चांगल्या नोकरीचे आमिष दाखवतात. या महिला अशिक्षित किंवा शाळा सोडलेल्या असतात. यानंतर कोलकाता येथे आल्यानंतर या महिलांना दुसर्या दलालाकडे सोपविले जाते. हा दलाल या महिलांना पुणे, मुंबईकडे ट्रेनने घेऊन येतो. अशा वेळी महिलांना घेऊन येणारा दलालसुद्धा खोटे नाव, खोटी कागदपत्रे वापरत असतो.
तसेच या प्रवासादरम्यान महिलांना इतर प्रवाशांसोबत बोलण्यास मनाई करण्यात येते. बांगलादेश ते पुणे असा प्रवास 20 ते 25 हजार रुपये घेऊन घडविला जातो. पुढे त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते. वेश्याव्यवसाय करणार्या महिलांना एकदम लहान जागेत ठेवले जाते. बुधवार पेठेतील जुन्या वाड्यात हे कुंटणखाने चालविले जातात. फक्त 5 बाय 7 च्या खोलीत या महिला राहतात. रखवालदार या महिलांना एक बेड, दोन भांडी, एक स्टोव्ह आणि काही खाद्यपदार्थ पुरवितो. महिला त्याच खोलीत जेवण बनवतात आणि राहतात.
अवैध पद्धतीने बांगलादेशातून आलेल्या महिला, पुरुष हे बंगाली भाषा बोलत असल्याने ते भारतीय आहेत की नाही? हे लवकर समजत नाही. याचा गैरफायदा हे अवैध पद्धतीने भारतात आलेले बांगलादेशी नागरिक घेत असतात.
वर्ष सापडलेले परत पाठविले
2013 06 00
2014 10 00
2015 02 00
2016 01 02
2017 02 01
2018 11 00
2019 07 00
2020 01 01
2021 00 02
2022 00 02
2023 ऑगस्ट 00 21
एकूण 61 08
शहरात अवैधपणे वास्तव्य करणार्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पथकाची निर्मिती करण्यात आली असून, समाजिका सुरक्षा विभाग आणि इतरांकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात बुधवार पेठ परिसरातून तब्बल 19 जणांना पोलिसांनी पकडून कारवाई केली आहे.
– रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)
हेही वाचा