नाशिकमध्ये तब्बल ११०० किलो बनावट खवा जप्त

नाशिकमध्ये तब्बल ११०० किलो बनावट खवा जप्त
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही दिवसांपूर्वीच अन्न, औषध प्रशासनाने धडक कारवाई करीत देवळाली कॅम्प परिसरातून २५० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले होते. आता पुन्हा एकदा द्वारका परिसरातून तब्बल ११०० किलो बनावट खवा जप्त करण्यात आला आहे. दोन खासगी बसने गुजरात राज्यातून हा खवा नाशिकमध्ये आणण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

संबधित बातम्या : 

शुक्रवारी (दि.१५) सकाळी द्वारका परिसरातील एका खासगी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात बनावट खवा उतरविला जाणार असल्याची माहिती अन्न, औषध प्रशासनास प्राप्त झाली. त्यानुसार सहायक आयुक्त मनीष सानप, उदय लोहकरे, अमित रासकर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकत तब्बल ११०० किलो खवा जप्त केला. यावेळी अधिकाऱ्यांनी खव्याची तत्काळ प्राथमिक तपासणी केली असता केमिकलयुक्त पावडर आणि पामतेलाने हा खवा बनविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच हा खवा गुजरात राज्यातून आणण्यात आल्याची माहितीही समोर आली. दरम्यान, या प्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, यापूर्वीदेखील अशा प्रकारचा बनावट खवा नाशिकमध्ये आणण्यात आला काय? याबाबतचा तपास केला जात आहे. दरम्यान, ज्या दोन खासगी ट्रॅव्हल्समधून हा बनावट खवा नाशिकमध्ये आणण्यात आला, त्या बसेस गुजरात राज्यातून आल्या होत्या. त्यामुळे गुजरात राज्यातून बनावट खाद्यपदार्थ नाशिकमध्ये आणले जात असल्याचा संशयदेखील व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सातत्याने नाशिकमध्ये भेसळयुक्त तसेच बनावट खाद्यपदार्थ आढळून येत आहेत. सध्या सणासुदीचा काळ असल्याने नाशिकमध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ आणले जात आहेत. अशात नागरिकांनीदेखील मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन अन्न, औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांमधील घटना

– देवळाली कॅम्पमध्ये २५० किलो भेसळयुक्त पनीर जप्त

– सिन्नरच्या मीरगावमध्ये काॅस्टिंग सोडा वापरून लाखो लिटर दूध केले नष्ट

– त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात निकृष्ट दर्जाचे पेढे, विक्रेत्यांवर कारवाई

– द्वारका परिसरात काही दिवसांपूर्वीच भेसळयुक्त खवा जप्त

गुप्त माहितीच्या आधारे आम्ही काही खासगी ट्रॅव्हल्सवर लक्ष ठेवून होतो. त्यानुसार गुजरात राज्यातून आलेल्या दोन ट्रॅव्हल्समध्ये बनावट खवा आढळून आला आहे. दोन ठिकाणी याबाबतची कारवाई केली गेली. दरम्यान, ज्यांनी हा खवा पुरविला तसेच ज्यांनी मागविला त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

– मनीष सानप, सहायक आयुक्त, अन्न, औषध प्रशासन

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news