ओझोनच्या थराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स एन्व्हॉयर्न्मेंट प्रोग्रॅमनुसार काळ जसजसा पुढे जात आहे, त्यासह चांगला ओझोन म्हणजे स्ट्रेटोस्फियर ओझोनची हानी होत आहे. या ओझोनच्या थराबद्दल लोकांना माहिती देणे आणि खराब झालेल्या ओझोन थराची जाणीव करून देणे, हा जागतिक ओझोन दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
ओझोन थरामुळे पृथ्वी आणि त्यावर राहणार्या सर्व जीवांचे हानिकारक किरणांपासून संरक्षण होते. वाढते प्रदूषण, पर्यावरणास हानी पोहोचवणार्या घटकांचा वाढता वापर, सर्रास कापली जाणारी झाडे यामुळे पृथ्वीच्या वातावरणात असलेल्या ओझोन थराचे नुकसान होत आहे. तो खराब होत आहे. ओझोनचे हे कवच 1970 च्या दशकापासून पातळ आणि क्षीण होत चालले होते. त्यावेळी शास्त्रज्ञांनी या बदलाविषयी अत्यंतिक चिंता व्यक्त केली होती आणि आता नाही तर कधीच नाही, अशी हाक देऊन ओझोनचा थर पूर्ववत करण्यासाठी मदत करण्याचे जगाला आवाहन केले होते. अंटार्क्टिकाच्या वरील ओझोनच्या थरात उत्तर अमेरिकेच्या आकाराचे जे छिद्र निर्माण झाले आहे, ते भरून काढण्यास 2060 साल उजाडू शकते, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
ओझोनचे सुरक्षाकवच कमकुवत होत असल्याचे सर्वप्रथम 1980 च्या आसपास अंटार्क्टिकाजवळ संशोधन करणार्या बि—टिश शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. अंटार्क्टिकाच्या वरील वातावरणात ओझोनच्या प्रमाणाची मोजदाद ते करीत होते. त्यांना जे दिसून आले, ते स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारीही नव्हती, एवढे भीषण संकट समोर होते. आपण जे पाहत आहोत, ते वास्तव आहे, यावर त्यांचा पहिल्यांदा विश्वासच बसला नव्हता.
वस्तुतः सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान तेथील वातावरणात ओझोनच्या प्रमाणात बरेच रिकामेपण जाणवते. त्यामुळे ओझोनच्या थरात काही वेळा पोकळ्या जाणवतात. त्यांना अंटार्क्टिका ओझोन छिद्रे म्हटले जाते. परंतु, शास्त्रज्ञांना असे दिसून आले की, हे छिद्र प्रचंड मोठे आहे. ऑस्ट्रेलियाच्या आकाराइतके मोठे छिद्र त्यांना दिसून आले. त्याच वेळी शास्त्रज्ञांनी ओझोनच्या बचावासाठी हाक दिली आणि संपूर्ण जगभरात हे वास्तव पोहोचले. ओझोनच्या समस्येविषयी भारत पहिल्यापासूनच चिंतित आहे. एवढेच नव्हे, तर ही समस्या नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे. जगभरात यासंबंधी झालेल्या प्रयत्नामध्ये भारतीय संशोधकांनी हिरिरीने भाग घेतला आहे. 1992 मध्ये झालेल्या मॉन्ट्रियल मसुद्यावर भारताने स्वाक्षरी केली आहे आणि ओझोनला हानिकारक ठरणारी कारणे दूर करण्यासाठी अनेक रसायनांच्या व्यापारावर निर्बंध घातले आहेत. ओझोन हा एक नैसर्गिक वायू आहे. हा वायू वातावरणात फार कमी प्रमाणात आढळतो.
पृथ्वीवर ओझोन वायू दोन क्षेत्रांमध्ये आढळतो. ओझोन हा वायू वातावरणाच्या वरील आवरणात म्हणजे स्ट्रेटोस्फियरमध्ये विरळ स्वरूपात आढळतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 17 ते 18 किलोमीटर अंतरावर हा वायू आढळतो. वास्तविक, यालाच ओझोनचा थर असे म्हटले जाते. वातावरणात असलेल्या एकंदर ओझोन वायूपैकी 90 टक्के ओझोन स्ट्रेटोस्फियर आवरणात असतो. परंतु, वातावरणाच्या आतील आवरणांमध्येही काही प्रमाणात तो आढळून येतो. दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास ओझोन हा वातावरणाचा असा थर आहे, जो आपल्या पृथ्वीचे अतिनील किरणांपासून रक्षण करतो. अतिनील किरणांमुळे मानवी त्वचेला विविध आजार होऊ शकतात. कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान जेव्हा सर्व औद्योगिक आस्थापनांचे कार्य थंडावले होते आणि दळणवळण ठप्प झाले होते तेव्हा ओझोनच्या थरामध्ये सुधारणा झाल्याचे समोर आले होते. परंतु, कोरोना गेल्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्या आणि प्रदूषणाचा राक्षस वर आला. यासाठी नेमके काय करायला हवे, याचे उत्तर मानवी समुदायाला ज्ञात असूनही त्या दिशेने अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत.
हेही वाचा :