बांगला देशचा भारतावर 6 धावांनी विजय; गिलचे शतक, अक्षरचे प्रयत्न व्यर्थ

बांगला देशचा भारतावर 6 धावांनी विजय; गिलचे शतक, अक्षरचे प्रयत्न व्यर्थ
Published on
Updated on

कोलंबो : वृत्तसंस्था आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारच्या फायनल पेपरपूर्वी झालेल्या पूर्व परीक्षेत टीम इंडिया फेल झाली. सुपर-4 फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगला देशने भारताला 6 धावांनी हरवले. बांगला देशने दिलेल्या 266 धावांचे लक्ष्य गाठताना भारताचे शुभमन गिल आणि अक्षर पटेल वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. गिलने 121 धावांची शतकी खेळी केली, तर अक्षर पटेलने 42 धावा केल्या. परंतु, तो सामना फिनिश करण्यात कमी पडला. एक चेेंडू शिल्लक असताना भारताचा डाव 259 धावांवर संपला.

बांगला देशच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा (0), तिलक वर्मा (5), इशान किशन (5) माघारी परतल्यानंतर के. एल. राहुल व शुभमन गिल यांनी 87 चेंडूंत 57 धावांची भागीदारी केली. महेदी हसनने ही जोडी तोडताना के. एल. राहुलला (19) माघारी पाठवले; पण शुभमनने चांगली खिंड लढवली. सूर्यकुमार यादव आणि शुभमन यांनी 45 धावांची भागीदारी केली खरी, परंतु सूर्या फिरकीपटूंना स्वीप मारताना चाचपडताना दिसला. शाकिबने करेक्ट कार्यक्रम करून सूर्याचा (26) त्रिफळा उडवला. शुभमनने संघावर दडपण येऊ नये, यासाठी जोरदार फटकेबाजी सुरू केली. रवींद्र जडेजाच्या कॉलवर धाव घेणे महागात पडले असते. परंतु, नशिबाने तो रन आऊट होता होता वाचला; पण जडेजाने (7) मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर विकेट टाकली.

एका बाजूने भारताची फलंदाजी ढासळत असताना शुभमन गिलने एका बाजूने किल्ला लढवत ठेवला. त्याने शतक ठोकत भारताला 200 च्या जवळ पोहोचवले. शतकानंतर गिलने आवश्यक रन रेट गाठण्यासाठी फटकेबाजी सुरू केली. यात त्याने महेदी हसनला उत्तुंग षटकार ठोकला. पुढच्या चेंडूवरही त्याने तसाच प्रयत्न केला; पण चेंडू बॅटच्या वरच्या भागात लागल्याने त्याचा झेल उडाला. लाँग ऑफवरील तोहिदने हा झेल घेतला. शुभमनने 133 चेंडूंत 121 धावा करताना 8 चौकार आणि 5 षटकार ठोकले. गिलनंतर संघाची मदार अक्षर पटेलवर होती, त्यानेही नसूम अहमदला षटकार ठोकला. शार्दूलसह अक्षर धावांसाठी प्रयत्न करीत होते. परंतु, गोलंदाज त्यांना संधी देत नव्हते. 48 व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर अक्षरने चौकार आणि षटकार ठोकले. त्यामुळे भारताच्या विजयासाठी 12 चेंडूंत 17 धावांचे लक्ष्य उरले.

मस्तफिजूरने पहिल्या चेंडूवर शार्दूल ठाकूरला (11) बाद केले. पुढच्या चेंडूवर शमीने एक धाव घेतली. तिसर्‍या चेंडूवर अक्षरने चौकार ठोकला, पण चौथ्या चेंडूवर अक्षर फसला. तान्झिद हसनने त्याचा झेल घेतला. अक्षरने 34 चेेंडूंत 42 धावा केल्या. येथे भारताचा पराभव निश्चित झाला. एक चेंडू शिल्लक असताना शमी धावचित झाल्याने भारताचा डाव 259 धावांवर संपुष्टात आला.

तत्पूर्वी, सुरुवातीच्या धक्क्यानंतरही कर्णधार शाकिब अल हसन ( 80) व तोहिद हृदोय (54) यांनी 101 धावांची भागीदारी केल्यामुळे 4 बाद 59 धावांवरून बांगलादेशला मोठी मजल मारता आली. लिटन दास (0), तांझीद हसन (13), अनामुल हक (4) आणि मेहिदी हसन मिराज (13) हे 59 धावांवर माघारी परतले. शाकिबने 85 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारासह 80 धावा केल्या. हृदोय 81 चेंडूंत 54 धावांवर झेलबाद झाला. नासूम अहमदने 45 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 44 धावा करून संघाला 8 बाद 265 धावांपर्यंत पोहोचवले. शार्दूल ठाकूरने 3, मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news