पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली जल बोर्ड घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आज अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहणार नाहीत. कोर्टातून जामीन मंजूर असताना ईडी वारंवार समन्स का पाठवत आहे? अंमलबजावणी संचालनालयाचे समन्स बेकायदेशीर आहे. ईडीच्या मागे लपून भाजपला निवडणूक का लढवायची आहे? असा सवाल आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
जल बोर्ड प्रकरणात, अरविंद केजरीवाल यांना आज (दि. १८) ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्याचबरोबर कथित दिल्ली दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणातही ते ईडीला सामोरे जात आहेत. या प्रकरणी एजन्सीने त्यांना रविवारी (दि.१७) नवव्यांदा समन्स पाठवले असून २१ मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. केजरीवाल यांच्यावर मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत नोंदवण्यात आलेला हा दुसरा गुन्हा आहे.
दिल्ली जल बोर्डातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी कारवाई करत आहे. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला असून ईडीने दोघांना अटक केली आहे. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार, आम आदमी पक्षाचे कोषाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार एनडी गुप्ता आणि इतरांच्या घरांवर छापे टाकले होते. आता या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे.
हेही वाचा :