ममता बॅनर्जी यांची नाराजी की खेळी? | पुढारी

ममता बॅनर्जी यांची नाराजी की खेळी?

सरोजिनी घोष, राजकीय अभ्यासक

देशातील 26 विरोधी पक्षांची इंडिया आघाडी नितीशकुमार, जयंत चौधरी यांच्या सोडून जाण्याने क्षीण झालेली असतानाच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर करत 42 जागांवर उमेदवारांची घोषणाही केली आहे. त्यांच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. तथापि, भाजपला कमीत कमी मते मिळावीत आणि  कोणाचीही मते एकमेकांमध्ये वाटली जाऊ नयेत, यासाठी सर्वांनी मिळून एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करणे, ही इंडिया आघाडीतील घटक पक्षांची धोरणात्मक खेळीही असू शकते.
लोकसभा निवडणुकांसाठी आता काही दिवस बाकी राहिलेले असताना राजकीय समीकरणांना अंतिम रूप देण्यामध्ये देशातील सत्ताधारी आणि विरोधक जोरदारपणे कामाला लागले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपने बाजी मारल्याचे दिसत आहे, तर काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नसल्याची स्थिती आहे. मध्यंतरी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या आघाडीतून बाहेर पडत पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश करत काँग्रेससह अन्य विरोधकांना जबरदस्त धक्का दिला होता. त्यानंतर जयंत चौधरींनी या आघाडीला रामराम केला. दरम्यानच्या काळात या आघाडीतील प्रमुख नेते असणार्‍या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि आता तर त्यांचे मूळ पक्ष चिन्ह व पक्षाचे नावही गेले आहे. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सने याआधीच आघाडीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. या सर्व धक्क्यांतून ही आघाडी सावरते न सावरते तोच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील ‘एकला चलो रे’चा नारा देत या राज्यातील 42 लोकसभा जागांसाठी  उमेदवार घोषित केले आहेत.
त्यांच्या या निर्णयामुळे इंडिया आघाडीत खळबळ उडणे स्वाभाविक होते. कारण, एक काळ असा होता जेव्हा 26 पक्षांनी मिळून ही आघाडी स्थापन केली तेव्हा ममता यांना या आघाडीच्या नेत्या म्हणून प्रोजेक्ट केले जात होते; पण त्याला नकार देत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना विरोधकांचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव देऊन नितीशकुमारांना नाराज केले होते. पुढे जेव्हा नितीश यांना महाआघाडीचे समन्वयक बनवण्याचा प्रस्ताव आणला गेला तेव्हा ममता यांच्या अनुपस्थितीचा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी त्याची घोषणा थांबवली. यानंतर आधी नितीश एनडीएमध्ये सामील झाले आणि आता ममतांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेससोबतच्या समन्वयामुळे नुकसान होऊ शकते आणि मतदार भाजपला मत देऊ शकतात, अशी ममता यांची धारणा आहे. ममता यांना अल्पसंख्याक मतदारांचीही चिंता आहे. काँग्रेसकडे तगडे उमेदवार असलेल्या एक-दोन जागा सोडल्या, तर भाजपच्या विरोधात अल्पसंख्याक मतदार त्यांच्या उमेदवारावर विश्वास ठेवतील, असे ममता यांना वाटते.
राजकारणात अनेकदा सत्य हे पृष्ठभागावर दिसत नाही. इंडिया आघाडीचा सदस्य असूनही ममता या पहिल्यापासून सांगत आल्या आहेत की, प. बंगालमध्ये त्या एकट्याच भाजपशी टक्कर देऊ शकतात. कारण, तृणमूल हा या राज्यातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली पक्ष आहे. अलीकडील काळात पश्चिम बंगालमधील भाजपचा वाढता प्रभाव हा तृणमूलसह सर्वच विरोधी पक्षांसाठी काळजीचा विषय ठरला आहे.  ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या 42 उमेदवारांच्या यादीत क्रिकेट जगतातील एका दिग्गजाचे नाव आहे.
टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू युसूफ पठाण याला तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. युसूफ पठाणला बहरामपूर मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अधीर रंजन चौधरी हे सध्या तिथले विद्यमान खासदार आहेत. तृणमूल काँग्रेसने यावेळी अभिनेत्री नुसरत जहाँचे तिकीट कापले आहे. तिच्या ऐवजी हाजी नुरुल इस्लाम यांना बशीरहाट लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे.

Back to top button