प्रशांत वाघाये, नवी दिल्ली, गेल्या काही दिवसांत अरविंद केजरीवाल यांना ईडीचे समन्स येणे, त्यांनी त्याला उत्तर म्हणून पत्र लिहिणे आणि चौकशीसाठी जाणे टाळणे, त्यावर भाजपने तातडीने मोठी पत्रकार परिषद घेऊन आरोप करणे आणि त्यानंतर 'आप'च्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर देणे हा क्रम काही आता नवा राहिलेला नाही… (Arvind Kejriwal)
आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे आणि याला कारण आहे दिल्लीतील मद्यधोरण आर्थिक गैरव्यवहार प्रकरण. आर्थिक गैरव्यवहारांच्या विविध प्रकरणांत यापूर्वीच आपचे बडे नेते दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह तुरुंगात आहेत. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) निशाण्यावर आहेत. मद्यधोरण आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात केजरीवाल यांना आतापर्यंत 4 वेळा समन्स बजावण्यात आले आहे. केजरीवाल यांनी मात्र चारही वेळा चार वेगवेगळी कारणे देत ईडीसमोर चौकशीला जाणे टाळले. नेमक्या याच मुद्द्यावरून केजरीवाल यांच्यासह आपवर टीका करण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. भाजप 2014 पासून देशात सत्तेत आहे. 2014 नंतर देशाच्या विविध राज्यांत भाजपने सत्ता मिळवली. काही राज्यांत निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष नसतानाही भाजप नव्या सहकार्यांसोबत सरकारमध्ये आले. त्यासाठी काही 'ऑपरेशन' करण्यात आले. मात्र, पंतप्रधानांसह संपूर्ण केंद्रीय मंत्र्यांचे वास्तव्य असलेल्या दिल्ली शहरात, दिल्ली विधानसभेत भाजपला सर्व प्रयत्न करून विजय मिळवता आला नाही. याचे शल्य भाजपाच्या मनात नक्कीच असणार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले किंवा भ्रष्टाचारापाच्या आरोपांतर्गत चौकशी होत असलेल्या विरोधकांवर भाजपने हल्ला चढवणे स्वाभाविक आहे. मात्र, आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर चौकशीचा ससेमिरा सुरू असताना भाजपच्या पत्रकार परिषदेत असलेली तीव्रता याबद्दल बरेच काही बोलून जाते.
अरविंद केजरीवाल यांच्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे केजरीवाल यांना काही फायदे आहेत, तर काही तोटेही आहेत. आप इंडिया आघाडीमध्ये आल्यानंतर काही पक्ष त्यांना सोबत घेण्यास अनुकूल नव्हते. मात्र, त्यांच्यावर सातत्याने आरोप होत असल्यामुळे त्यांना इंडिया आघाडीतील पक्षांची सहानुभूती मिळत आहे. कारण, केजरीवालांप्रमाणे विरोधी पक्षातील प्रमुख नेते या ना त्या कारणाने ईडीच्या निशाण्यावर आहेत. काहींची चौकशी झाली आहे, तर काही तुरुंगवास भोगून आले. काहींच्या मागे अजूनही चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी निमित्त वेगळे असले, तरी बहुतांश विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. जे पक्ष आम आदमी पक्षाला विरोध करत होते त्यांच्यात आणि आम आदमी पक्षात यानिमित्ताने संवाद होत आहे. येत्या काळात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तो फायदेशीर आहे, असे असले तरी शून्य भ्रष्टाचाराबद्दल बोलणार्या आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते वेगवेगळ्या आरोपांमध्ये तुरुंगात आहेत. त्यामुळे आपच्या भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ या प्रतिमेला जनमाणसांत तडा गेला आहे.
हेही वाचा