Russia Ukraine War : सुमी शहरातून भारताच्या ७०० विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न फसले

Russia Ukraine War : सुमी शहरातून भारताच्या ७०० विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न फसले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया – युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) काळात युक्रेनमधील सुमी (Sumy) शहरात अडकलेल्या ७०० भारतीय विद्यार्थ्यांची बाहेर पडण्याची आशा पूर्ण होता होता राहिली. युक्रेनमधील सुमी येथील विद्यार्थ्यांनी सांगितले की, युद्धबंदीनंतर त्यांना घेण्यासाठी ३ बस आल्या होत्या. मुलींना प्रथम बसमध्ये चढण्यास सांगण्यात आले. आता १२ दिवसांच्या युद्धानंतर सुमी शहरातून बाहेर पडू शकू या आशेने मुली बसमध्ये चढल्या होत्या, पण त्याच दरम्यान बातमी आली की सुमीमधील युद्धबंदी संपली आणि मुलींना बसमधून बाहेर काढण्यात आले तसेच त्यांना पुन्हा वसतिगृहात परत पाठवण्यात आले.

युक्रेनमधील (Russia Ukraine War) सुमी येथून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बस येत असल्याची माहिती देण्यात आली. भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सुमी येथील भारतीय दूतावासाला सहकार्य करणाऱ्या सूत्रांनी आणि सुमीमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी देखिल या माहितीला दुजोरा दिला आहे.

सुमीमध्ये (Russia Ukraine War) असणाऱ्या मुत्तुथरा अखिलेशन या भारतीय विद्यार्थिनीने सांगितले की, "सुमारे दीड तासापूर्वी तीन बसेस सुमी मधून आम्हाला घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. आधी मुलींना बसमध्ये चढू द्या, असे सांगण्यात आले, पण नंतर तुम्हाला घेऊन जाण्याची ही योजना युद्धबंदी संपली असल्याचे कारण देत येथेच थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मग सर्व मुलींना बसमधून उतरवून वसतिगृहात परत पाठवण्यात आले. आम्ही वसतिगृहात पुढील माहितीची वाट पाहत आहोत."

सुमीमध्ये (Russia Ukraine War) असलेल्या हिबाने सांगितले की, "२ वसतिगृहांमध्ये सुमारे ७०० भारतीय विद्यार्थी आहेत. आज सकाळी आम्ही खूप आनंदी होतो आणि सकाळी १० च्या सुमारास बसमध्ये चढण्यास तयार झालो. आम्हाला आधी बसमध्ये चढण्यास सांगण्यात आले. सर्व मुली आम्ही बसमध्ये होतो आणि मग बातमी आली की आम्हाला हॉस्टेलला जायचं आहे. खूप वाईट वाटलं. आज इथून निघू शकू की नाही माहीत नाही. आम्ही अजून वाट पाहतोय."

सुमीमध्ये (Russia Ukraine War) अडकलेल्या ७०० भारतीय विद्यार्थ्यांना आज केव्हाही सुमीमधून बाहेर काढले जाईल अशी बातमी दूतावासाकडून मिळाली होती. सुमी येथील विद्यार्थ्यांना प्रथम युक्रेनमधील पोल्टावा येथे नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. सुमी ते पोल्टावा हे अंतर १७५ किमी आहे.

त्याचवेळी, एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनने बेलारूस, रशियासाठी मॉस्कोने प्रस्तावित केलेला ह्युमन कॉरिडॉर नाकारला आहे. रशियाने सोमवारी युक्रेनमधील चार शहरांमध्ये युद्धविराम जाहीर केला. या शहरांमध्ये कीव, खार्किव आणि सुमी यांचाही समावेश आहे. येथून नागरिकांना जाण्यासाठी ह्युमन कॉरिडॉर देण्यात येणार होता.

भारतीय विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी आवाहन करत आहेत. रशियन-युक्रेन युद्ध लवकरात लवकर बंद होईल, अशी माहिती भारतीय अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. दरम्यान, सुमीमधील भारतीय विद्यार्थ्यांना कधीही बाहेर पडण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आशा आहे की या युद्धविरामात भारतीय अधिकारी त्यांना सुमीमधून बाहेर काढतील. युद्धाची भीषणता पाहता भारत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. सूत्रांनी सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बसेस सुमीला येणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना सुमीतून बाहेर काढण्यासाठी रेडक्रॉसची मदत घेतली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news