अनंत गीतेंना ठाकरे गटाकडून मुंबईतून लोकसभेची उमेदवारी, तर रायगड राष्ट्रवादीकडेच राहणार!

anant geete
anant geete

खेड शहर : पुढारी वृत्तसेवा – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने आतापासूनच हालचालींना सुरुवात केली आहे. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना येत्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून मुंबईतून उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा  आहे. लोकसभेसाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाल्यास गीते यांचे मुंबईतून पुनर्वसन करून त्यांना लोकसभेत पाठवण्याची तयारी सुरू  आहे.

राज्यात राजकीय पक्षांकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. अनंत गीते हे ठाकरे गटासोबत आहेत. त्यांचे कोकणात दौरे वाढत आहेत.  त्यामुळे त्यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे अद्यापही निश्चित व्हायचे आहे. त्यांना मुंबईतील एखाद्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. कारण मुंबईतील शिवसेनेतून निवडून आलेले दोन खासदार हे ठाकरे गटातून शिंदे गटात गेले आहेत.

त्यामुळे या दोन जागांपैकी एका जागेवर गीतेंना संधी मिळू शकते. भाजपने कोकणात मिशन लोकसभा सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपकडे ताकदीचा उमेदवार नसल्याने शेतकरी कामगार पक्षाचे धैर्यशील पाटील यांना भाजपने प्रवेश देत या लोकसभा मतदारसंघाची तयारी सुरू केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात २०१९ पूर्वी शिवसेनेचे अनंत गीते हे तीन वेळा निवडून आले आहेत.

मात्र, २०१९ च्या निवडणुकीत गीते यांचा अनपेक्षित पराभव होत सुनील तटकरे हे २५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. आता भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यामुळे आता भाजपने रायगड लोकसभा मतदारसंघाची तयारी सुरू केली आहे.

भाजपला शह देण्यासाठी राज्यात उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. रायगडची जागा राष्ट्रवादीकडे असल्यामुळे गीते यांचे मुंबईत पुनर्वसन करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या गटात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान लोकसभा निवडणूक कुठून लढवावी, याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली नाही. मात्र, आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी मतदार आतुर आहे. मतदारांच्या मनात ठाकरे कुटुंब आहे. कोकण आणि मुंबईतील मतदार ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहतील, अशी प्रतिक्रिया अनंत गीते यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news