कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: दिवाळीसाठीही आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. त्याचे वाटप बुधवार, दि. 25 पासून करण्यात येणार आहे. तसे आदेश राज्य शासनाने गुरुवारी (दि. 19) दिले आहेत. राज्यात या योजनेअंतर्गत 1 कोटी 58 लाख 33 हजार 718 कार्डधारकांना लाभ दिला जाणार आहे. (Anandacha Shidha)
या योजनेअंतर्गत यापूर्वी चार वस्तू दिल्या जात होत्या. त्यात दिवाळीसाठी मैदा आणि पोहे यांचा समावेश केला आहे. यामुळे साखर, खाद्यतेल प्रत्येकी एक किलो, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे प्रत्येकी अर्धा किलो, अशा सहा वस्तूंचा संच शंभर रुपयांत दिला जाणार आहे. (Anandacha Shidha)
कार्डधारकांना देण्यात येणार्या या संचातील वस्तूंच्या दर्जाबाबत दक्षता घ्या, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. मैदा आणि रवा या वस्तूंची खाण्योग्य मुदत संपण्यास किमान तीन महिन्यांपेक्षा अधिक, तर अन्य चार पदार्थांच्यासाठी चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी राहणार नाही, याचीही खात्री करण्याची सूचना देण्यात आली आहे. (Anandacha Shidha)
गौरी-गणपती सणासाठी आनंदाचा शिधा दिला होता. या शिधा वाटपात कोल्हापूर आघाडीवर होते. पुणे विभागातील पहिल्या पाचपैकी तीन जिल्ह्यांनी राज्यात आघाडी घेतली. त्यात कोल्हापूरचा समावेश होता. प्रशासनाने वेळेत शिधा उपलब्ध करून दिला. दुकानदारांनीही तो वेळेत शिधापत्रिकाधारकांना पोहोच केला. याबाबत पुणे विभाग पुरवठा उपआयुक्त समीक्षा चंद्राकर यांनी दुकानदारांचे विशेष कौतुक केले. कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे यांनी उपआयुक्त चंद्राकर यांचे आभार व्यक्त केले. यावेळी पुणे विभाग तांत्रिक अधिकारी संतोष सरडे, जिल्हा सचिव दीपक चौगुले, शीतल बरकडे, पल्लवी सपकाळे आदी उपस्थित होते.
या शिधा संचापैकी एक घटक असलेले पोहे जिल्ह्यात गुरुवारी दाखल झाले. येत्या चार-पाच दिवसांत सर्वच वस्तू दाखल होणार आहेत. संच पूर्ण झाल्यानंतर दुकानदारांना त्याचे वितरण केले जाईल आणि त्यानंतर ते ग्राहकांना दिले जाणार आहे.