पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपार चर्चा झाली आहे. मुंबईत भाजपला ५ आणि शिंदेच्या शिवसेनेला १ जागेचा प्रस्ताव भाजपचे नेते अमित शहांनी दिला आहे. भाजपचा हा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेने अमान्य केल्याचे समजते. दरम्यान, अमित शहा आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये मंगळवारी रात्री उशिरा बैठक संपली. आज (दि.६ मार्च ) सकाळी पुन्हा बैठक हाेणार हाेती. मात्र अमित शहा वांद्रेकडे रवाना झाले आहेत. तसेच सर्व नेते बीकेसीमध्ये कार्यक्रमाला रवाना झाल्याने ही बैठक हाेवू शकली नाही.
दोन मार्च रोजी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह 34 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असलेली पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झालेला असून, तो सोडवण्यासाठीच अमित शहा मंगळवारी महाराष्ट्राच्या दोनदिवसीय दौर्यावर दाखल झाले. अकोला, जळगाव, जालना इथे त्यांचे कार्यक्रम झाले. छत्रपती संभाजीनगरात त्यांची जाहीर सभा झाली. मराठवाड्यातील जागावाटपाचा अंदाज घेऊन अमित शहा मंगळवारी रात्रीच मुंबईत पोहोचले.मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांची उशिरापर्यंत खलबते सुरू होती.
गेल्यावेळी 2019 मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या काही जागा भाजपला हव्या आहेत. भाजपने किमान 30 ते 32 जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली. शिवसेनाही गेल्यावेळेस लढलेल्या सर्व म्हणजे 22 जागांसाठी आग्रही आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील गेल्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वात जिंकलेल्या जागांच्या तिप्पट 12 जागांसाठी आग्रह धरला आहे.
महाराष्ट्रात गेल्यावेळी 48 पैकी युतीला 41 जागा मिळाल्या होत्या. या जागा कमी होता कामा नयेत. युतीत ज्या पक्षाची जिंकण्याची शक्यता अधिक आहे आणि ज्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, हे पाहून जागावाटप करावे, अशा सूचना अमित शहा यांनी 'सह्याद्री'वरील बैठकीत दिल्याचे कळते. काही जागांवर मतभेद आहेत. विशेषत:, ठाणे, गडचिरोली, परभणी, रामटेक या मतदारसंघांत भाजप आणि शिंदे गटात एकमत झालेले नाही.
या बैठकीमध्ये काही संभाव्य पक्ष प्रवेशावरही चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेसचे काही आमदार आणि महत्त्वाचे नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी विरोधकांना धक्के देत हे पक्ष प्रवेश केले जाऊ शकतात. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :