आधी जागा वाटपावर निर्णय घ्या, नाहीतर आम्ही स्वतंत्र : बच्चू कडू यांचा महायुतीला इशारा | पुढारी

आधी जागा वाटपावर निर्णय घ्या, नाहीतर आम्ही स्वतंत्र : बच्चू कडू यांचा महायुतीला इशारा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : भाजपला जशी लोकसभा महत्त्वाची आहे तशीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. लहान पक्षासोबत अद्याप कुठलीही बोलणी झालेले नाही. त्यामुळे आधी आम्हाला विधानसभेमध्ये किती जागा देणार हे भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करावे, नाहीतर आम्ही स्वतंत्र आहोत, असा इशारा प्रहार चे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला दिला आहे. रविवारी ते (३) अमरावती येथे माध्यमांशी बोलत होते.
जोपर्यंत विधानसभेची बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही विचार केलेला नाही. लोकसभेची सध्या आमची तयारी नाही. मात्र कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाडायचे हे आम्ही ठरवू असे बच्चू कडू म्हणाले.

नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपचचं

दरम्यान नवनीत राणा सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपचचं आहे. आधी नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबावर निवडून आल्या. तेव्हा त्या निळा, भगवा, हिरवा झेंडा घेऊन लढत होत्या. आता त्या हिंदू शेरनी झाल्या आहेत, असे बच्चू कडू म्हणाले.

युवा स्वाभिमान पक्ष भाजपला संपवायचाय

पुढचा खासदार हा अमरावतीमध्ये भाजपचाच असेल असा दावा भाजपकडून केला जात आहे. आणि दुसरीकडे नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. त्यामुळे यावरून बच्चू कडू यांनी बोलताना, राणा यांना भाजपमध्ये घेऊन युवा स्वाभिमान पक्ष भाजपला संपवायचा आहे. त्यांचा स्वाभिमान संपवायला नको. याची काळजी भाजपने घ्यायला पाहिजे असे ते म्हणाले. भाजप कितीही मोठा पक्ष असला तरी तो आम्हाला (प्रहारला) संपवू शकत नाही. त्यांच्याकडे संख्या असली तरी आमच्याकडे गुणवत्ता आहे, असेही कडू यांनी स्पष्ट केले.
2024 मध्ये मोदींची गॅरंटी लोकसभा निवडणुकीत चालणार का, या प्रश्नाच्या उत्तरा दाखल बच्चू कडू यांनी सक्षम विरोधी पक्ष अथवा नेता देश पातळीवर सध्या नसल्याचे सांगितले. काँग्रेसमध्ये देखील पानदान वाजले असून सगळ्या फांद्या तुटल्या आहेत असे ते म्हणाले. प्रहार चे दहा-पंधरा आमदार निवडून आल्यास आणि आमचा मुख्यमंत्री झाल्यास व्यवस्था बदलू असेही बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा

Back to top button