पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिका आणि युरोपमध्ये आर्थिक मंदीचे सावट आहे. यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांत नोकरकपात सुरु आहे. अमेरिकन बहुराष्ट्रीय फूड कंपनी पेप्सिको (PepsiCo) त्याच्या उत्तर अमेरिकन स्नॅक्स आणि शीतपेयांच्या वर्टिकलच्या मुख्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचे वृत्त याआधी समोर आले होते. पेप्सिको अमेरिकेत नोकरकपात करत असली तरी भारतात मात्र त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवणार आहे. पेप्सिकोला भारतीतील मोठी बाजारपेठ खुणावत आहे. यासाठी पेप्सिकोने हैदराबादमध्ये त्यांचा व्यवसाय वाढवण्याची आणि पुढच्या दीड वर्षात १,२०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखली आहे.
PepsiCo चे ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस सेंटर हैदराबादमध्ये २०१९ मध्ये सुरु झाले होते. त्यावेळी तेथे २५० कर्मचारी होते. सध्या येथे २८०० कर्मचारी काम करतात. येथील कर्मचारी संख्या आणखी १२०० ने वाढविल्यास एकूण संख्या ४ हजार होणार आहे. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान कंपनीने ही घोषणा केली.
पेप्सिकोचे EVP कॉर्पोरेट अफेयर्स रोबेर्टो अझेवेदो यांनी नुकतीच तेलंगणा पॅव्हेलियन येथे तेलंगणाच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री यांची भेट घेतली आणि कंपनीच्या हैदराबादमधील विस्तार योजनांबाबत चर्चा केली. दरम्यान, तेलंगणाचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री केटीआर यांनी हैदराबादमधील पेप्सिकोच्या ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस सेंटरच्या जलद विस्ताराबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि कंपनीच्या भविष्यातील सर्व गुंतवणुकीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. या बैठकीदरम्यान, तेलंगणामधील पेप्सिको खाद्य उत्पादनांच्या संधींवरही चर्चा करण्यात आली.
पेप्सिको तेलंगणा सरकारच्या सहकार्याने शाश्वत उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे. ज्यात पाण्याच्या कार्यक्षम वापरात सुधारणा, प्लास्टिकचा पुनर्वापर करणे आदी गोष्टींचा समावेश आहे, असे हैदराबाद येथील मंत्री केटीआर यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पेप्सिको कोल्ड्रिंकशिवाय डोरिटॉस नाचोस (Doritos nachos, बटाटा चिप्स आणि क्वेकर ओट्स नावाचे स्नॅक्स बनवते. अन्नपदार्थ आणि शीतपेयांचे उत्पादन घेणाऱ्या या कंपनीमुळे जगभरात सुमारे ३ लाख ९ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. ज्यात अमेरिकेतील सुमारे १ लाख २९ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पेप्सिको आणि इतर अन्नपदार्थ, शीतपेये उत्पादन घेणाऱ्या कंपन्या कच्चा माल (कॉर्न, साखर आणि बटाटे) तसेच वाहतूक आणि मजुरांवर होणारा वाढता खर्च कमी करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवत आहेत. किमती वाढूनही किराणा दुकानांमध्ये अन्नपदार्थ आणि पेय पदार्थांची वाढती मागणी कायम आहे. (PepsiCo)
हे ही वाचा :