Akola Crime : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे अकोल्यात तणाव; एकाचा मृत्यू, कलम १४४ लागू

file photo
file photo

अकाेला; पुढारी वृत्तसेवा : समाजमाध्यमावर टाकण्यात आलेल्या पोस्टवरुन वाद उफाळून आल्यावर जुने शहरात (अकोला) दाेन गटात शनिवारी (दि.१३) रात्री ११: ३० वाजताच्या सुमारास दोन गट आमनेसामने आल्याने वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारी, दगडफेक, जाळपोळमध्ये झाली. दरम्यान काही काळ शहरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.(Akola Crime) आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी २६ जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रुधुराच्या कांड्या फाेडल्या व गोळीबार सुद्धा केला. या  घटनेत एका इसमाचा मृत्यू झाला. तर तर शैला नामक एक महिला पोलीस कर्मचारीसह जवळपास १० जण जखमी झाल्याची माहिती आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे," असे अकोल्याचे एसपी संदीप घुगे यांनी सांगितले. घटनेची दखल घेत रात्री उशीरा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जुने शहर, डाबकी रोड, सिटी कोतवाली व रामदास पेठ या चारही पोलिस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे.  (Akola Crime)

Akola Crime : समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट

माहितीनूसार, समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे संतप्त झालेल्या एका गटाने ताेडफाेड व दगडफेक सुरू केल्याने दाेन गटांत वाद झाला. परस्परांवर जमाव चालून गेल्याने एकच धावपळ उडाली. जुने शहर पोलीस ठाणे हद्दीत दंगेखोरानी दगडफेक आणि जाळपोळ केली. दंगलखोर एकमेकाच्या विरूद्ध नारेबाजी करीत दगडफेक करीत सुटले होते. अनेक दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची नासधूस केली. एक दुचाकी आणि एक चारचाकी गाडी जाळण्यात आली. दंगलखोरांनी पोलीस व्हॅन आणि अग्निशमन दलाच्या गाडीच्या काचा फोडल्या. परिसरातील एक घर पेटवून दिल्यानंतर या भागात आगीचे डोंब उसळल्याने सामान्य नागरीक भयभीत झाले होते.

Akola Crime : चार पोलिस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यु

संपूर्ण परिस्थितीवर पोलिसांना नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. दरम्यान परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाेलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फाेडल्या व गोळीबार सुद्धा केला. जिल्हा पाेलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह शहरातील सर्वच पाेलिस ठाण्यांचे ठाणेदार व पाेलिस कर्मचाऱ्यांनी उशिरा रात्री दंगल सदृश्य परिस्थिती नियंत्रण मिळविले. खबरदारीचा उपाय म्हणून चार पोलिस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यु लावण्यात आला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

घटनास्थळावर जिल्हा पाेलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलिस अधीक्षक सुभाष दुधगावकर यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, शहराध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार वसंत खंडेलवाल, जुने शहरचे ठाणेदार सेवानंद वानखडे, डाबकीराेडचे ठाणेदार शिरिष खंडारे आदी पाेलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शहरवासियांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news