चहामध्ये सोन्याचे पाणी टाकून देत होते की काय?, ‘वर्षा’वरील खर्चावर अजित पवारांचा हल्लाबोल

चहामध्ये सोन्याचे पाणी टाकून देत होते की काय?, ‘वर्षा’वरील खर्चावर अजित पवारांचा हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट झाला आहे. लोकप्रतिनिधींची सुरक्षिता धोक्यात आली आहे. अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार शिवीगाळ, मारहाण करत आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांना 'एसीबी'च्या नोटीसा पाठिवल्या जात आहेत. विकासकामांमध्ये राजकारण केले जात आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांनी राज्य कारभाराकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाचा खानापानाचा खर्च चार महिन्यात अडीच कोटी इतका झाला आहे. चहामध्ये सोन्याचे पाणी टाकून देत होते की काय ? असा खोचक सवाल  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची बैठक आज (दि. २६) विधान भवनात झाली. त्यानंतर अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकल्याचे सांगितले.
पवार पुढे म्हणाले की, सोलापूरमधील बार्शीतील कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र चव्हाण यांना ५०० किलो कांदा २ रुपये दराने विकावा लागला. त्यामुळे कांद्याला योग्य दर मिळणे गरजेचे आहे. असे प्रसंग शेतकऱ्यांवर येता कामा नये, त्यासाठी राज्य सरकारने कांदा निर्यात करण्यासाठी तत्काळ पावले उचली पाहिजेत. तातडीने विचार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही,असेही पवार म्हणाले.

मनसेचा एकच आमदार जर दुसरीकडे गेला, तर त्याला पक्षाचे चिन्ह देणार का ?

राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबाला धमकी दिली जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर हल्ला होत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. राज्यातून उद्योग बाहेर गेले आहेत. परंतु एकही नवा उद्योग राज्यात आलेला नाही, गुंतवणूक झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाचा खानापानाचा खर्च चार महिन्यात अडीच कोटी इतका झाला आहे. चहामध्ये सोन्याचे पाणी टाकून देत होते की काय ? असा खोचक प्रश्न पवार यांनी केला. सरकारकडून जाहिरातींवर भरमसाठ खर्च केला जात आहे. परंतु जिल्हा नियोजन समितीचा एक रूपयाही खर्च केलेला नाही, असे पवार यांनी सांगितले.
मनसेचा एकच आमदार जर दुसरीकडे गेला, तर त्याला पक्षाचे चिन्ह देणार का ? असा सवाल करत पवार यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

दरम्यान, सभागृहात सत्ताधाऱ्यांविरोधात सर्व आयुधांचा वापर करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू, विविध घटकांना सभागृहात न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. विरोधी पक्षाच्या मुंबईतील या बैठकीला आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, अनिल परब आदी नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडी उध्दव ठाकरे सोबत…

शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांचा विश्वासघात करुन तुम्ही मराठी माणसांचा अभिमानबिंदू असलेली शिवसेना फोडली. त्याचा राग जनतेच्या मनात आहे. गेल्या आठ महिन्यात मुख्यमंत्र्यांनी ज्या वेगानं निष्ठा बदलली, त्याचा राग शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनात आहे. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षासमोरील आव्हानाच्या काळात महाविकास आघाडीतील आम्ही सर्व घटकपक्ष सन्माननीय उद्धवजी ठाकरे आणि शिवसैनिकांसोबत भक्कमपणे उभे आहोत.

तर हा महाराष्ट्र द्रोह ठरेल…

राज्य सरकारची गेल्या आठ महिन्यातली अवस्था परिस्थिती बघितली तर, राज्याचे मुख्यमंत्री हे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमानाचं रक्षण करण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्याची ताकद, क्षमता नाही. राज्याबाहेरील शक्तींच्या आदेशाने मुख्यमंत्र्यांचा कारभार चालू आहे. स्वविचाराने निर्णय घेण्याचा, निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा कुठलाही अधिकार त्यांना नाही. अशा नामधारी, घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला, आज संध्याकाळी चहापानाला बोलवलं होतं. त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं, हा महाराष्ट्रद्रोह ठरला असता. राज्यातील जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती. त्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं, आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळं सरकारच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news