पुढारी ऑनलाईन: राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर लगेचच विधानसभेच्या चिंचवड आणि कसबा पेठ या दोन जागांच्या पोटनिवडणुकीची सर्वत्र एकच चर्चा आहे. ही निवडणूक भाजपा-शिंदे गट तसेच महाविकास आघाडीकडून संपूर्ण ताकदीने लढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची असणार आहे. यामुळेच चिंचवड येथे त्यांनी सभांचा धडका लावला आहे. सोमवारी त्यांनी चिंचवड येथे जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत बिलाटनी अजित पवारांनी आपल्याला चिंचवड, कसबा पेठ ही निवडणूक जिंकायची आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले, त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, अशी भावनिक साद घातली आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा आपल्या विचारांच्या निवडून आलेल्या आहेत. याचाच अर्थ भाजपा आणि शिंदे गटाला अद्याप त्यांची जागा समजलेली आहे. मात्र, आपल्यासाठी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, ज्या प्रकारे त्यांना पायऊतार व्हावे लागले, त्याचा बदला उद्याच्या निवडणुकीतून घ्यायचा आहे. या भागात मी मागील ३० ते ३२ वर्षांपासून काम करत आहे. याच शहराने मला १९९१ मध्ये पहिल्यांदा खासदार केले होते," असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
या सभेत अजित पवार यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाचा एकही आमदार, खासदार निवडून येणार नाही, असा मोठा दावाही त्यांनी केला. "शिवसेना पक्ष कोणी काढला हे सर्वांनाच माहिती आहे. जे पक्ष सोडून गेले त्यांचा शिवसेना उभी करण्यात नखाचाही वाटा नाही. केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिल्यामुळे ते निवडून आले. आम्हीही सर्वांनी ते पाहिलेले आहे. अगदी पानटपरीवाले, वाहनं चालवणारी साधी-साधी माणसं खासदार, आमदार झाले. हे सर्व फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शक्य झाले," असे अजित पवार म्हणाले. तसेच बाळासाहेबांनी ठाकरे यांनी सांगितलेले असताना सटर फटरवाले मध्येच काय करत आहेत. उद्या निवडणुका लागु द्या. त्यांची काय अवस्था होईल हे त्यांना समजेल, असा टोला देखील अजित पवार यांनी शिंदे गटाला लगावला.