बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना अग्निवीर असलेले अक्षय लक्ष्मण गवते (Buldhana Agniveer Akshay Gawate) हे शहीद झाले आहेत. अक्षय गवते हे शहीद झालेले पहिले अग्निवीर आहेत. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये ते कर्तव्य बजावत होते.
अक्षय हे मूळचे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या गावचे आहेत. त्यांनी नऊ महिने सैन्यात कर्तव्य बजावले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, २० ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
संबंधित बातम्या
अग्निवीर अक्षय गवते यांच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. सियाचीन ही काराकोरम पर्वतरांगातील २० हजार फूट उंचीवरील जगातील सर्वांत उंच रणभूमी आहे, जिथे सैनिकांना कर्तव्य बजावताना हाडे गोठवणारी थंडी आणि हिमवादळांशी तोंड द्यावे लागते.
अक्षय हे भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचा एक भाग होते. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून अक्षय यांना श्रद्धांजली वाहिली आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने 'एक्स' वर पोस्ट करत म्हटले आहे की, ""बर्फात शांतता, बिगुल वाजल्यावर ते उठतील आणि पुन्हा कूच करतील. अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांच्या सर्वोच्च बलिदानाला फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या सर्व रँकचा सलाम. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो," असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
लेह येथे मुख्यालय असलेल्या भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्समध्ये अक्षय यांची पहिली पोस्टिंग झाली होती. भारतीय लष्करानेही या दुःखाच्या वेळी जवानाच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे.
ही दु:खद वार्ता कळल्यानंतर अग्निवीर अक्षय गवते यांचे मूळगाव पिंपळगाव सराई व परिसरात शोककळा पसरली. सियाचीन ग्लेशियर या उंच बर्फाळ प्रदेशात टेलिफोन ऑपरेटर म्हणून सैन्यदलात ३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय गवते हे कर्तव्यावर रूजू झाले होते. अवघ्या नऊ महिन्यांची सेवा झालेल्या अक्षय यांना २० आक्टोबर रोजी रात्री ११.३५ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारासाठी तात्काळ सैनिकी रूग्णालयात हलविण्यात आले. पण तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. २२ वर्षीय अक्षय गवते हे आई-वडिलांचे एकूलते पुत्र होते. अग्निवीर अक्षय यांचे पार्थिव जम्मू-कश्मीर येथून विमानाने दिल्लीमार्गे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले. सोमवारी २३ आक्टोबरला त्यांचे मूळगाव पिंपळगाव सराई येथे त्यांचे पार्थिव दाखल होईल व तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अक्षय यांचे शालेय शिक्षण गावातीलच जनता विद्यालयात झाले होते.
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निवीरांच्या भरती अटींमध्ये संघर्षादरम्यान अग्निवीरचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना आर्थिक सुरक्षेची तरतूद केली आहे. त्यानुसार, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना ४८ लाख रुपये नॉन-कॉन्ट्रिब्युटरी इन्शुरन्स तसेच ४४ लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळेल. तसेच अग्निवीरने (३० टक्के) योगदान दिलेल्या सेवा निधीकडून त्यांच्या वारसांनादेखील सरकारच्या समान योगदानासह आणि त्यावर व्याजाची रक्कम मिळेल. (Buldhana Agniveer Akshay Gawate)