चार वर्षांतील पगारातून बचत केल्यास 5 ते 6 लाख रुपये आणि चार वर्षांनंतर मिळणारे 14 लाख रुपये अशी 20 लाख रुपयांची स्वकष्टार्जित रक्कम अग्निवीरांच्या हातात चार वर्षांनंतर असू शकेल. अग्निपथ योजनेनुसार 17 ते 23 या वयोगटातील तरुणांची सैन्याच्या तीनही शाखांमध्ये अग्निवीर म्हणून भरती केली जाईल. चार वर्षांनंतर प्रशिक्षित तरुणांपैकी 25 टक्के तरुणांना योग्य त्या कसोट्या लावून त्या त्या शाखेमध्ये कायमस्वरूपी नोकरीसाठी घेतले जाईल आणि उरलेल्या 75 टक्के अग्निवीरांना सेवामुक्त करून परत पाठविले जाईल.
योजनेची उद्दिष्टे
असे समजू की, एखादा अग्निवीर चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर सेवामुक्त होऊन घरी परत आला आहे. त्याला काय मिळू शकेल? वय वर्षे फक्त 23 वर्षे. चार वर्षांच्या काळामध्ये अग्निवीरांच्या पगारातून दरमहा काही रक्कम सरकार कापून घेईल. तेवढीच रक्कम सरकारतर्फे घातली जाईल. 48 महिन्यांच्या काळांमध्ये ही एकत्रित (अग्निवीर अधिक सरकार) रक्कम जवळ जवळ बारा लाख रुपये होईल. त्याच 48 महिन्यांमध्ये निदान दोन लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच एकत्रित रक्कम साधारण चौदा लाख रुपये होऊ शकेल. ही सर्व रक्कम सेवामुक्त होणार्या अग्निविराला एकरकमी दिली जाईल. त्याचा विनियोग स्वतःच्या इच्छेप्रमाणे तो करू शकेल.
प्रशिक्षणाच्या चार वर्षांमध्ये राहणे, जेवणखाण, कपडालत्ता, औषधपाणी इ. सर्व बाबी अग्निवीराला सरकारतर्फे मोफत मिळतील. याशिवाय दरमहा पगार मिळेल. सरकारने कापून घेतलेली रक्कम वजा केल्यावर हा पगार पहिल्या वर्षी दरमहा 21 हजार, दुसर्या वर्षी 23 हजार, तिसर्या वर्षी 25 हजार आणि शेवटच्या वर्षी दरमहा 28 हजार असेल. म्हणजेच 48 महिन्यांमध्ये पगारापोटी एकूण 11 लाख 64 हजार रुपये मिळतील. तो अग्निवीर जर विचारी, कष्टाळू आणि होतकरू असेल त्याला भरपूर बचत करता येईल. घरची जबाबदारी फारशी नसल्यामुळे या एकूण पगारापैकी अगदी अर्धी रक्कम सहज बचत करता येईल.
साधारण 5 ते 6 लाख! जे कष्टाळू आणि विचारी भारतीय विद्यार्थी किंवा नोकरदार अमेरिकेत जातात तेव्हा तेथे शक्यतो साधेपणाने राहून, स्वतः स्वयंपाक करून, डॉलर्स वाचवितात. मात्र, तो उमेदवार उधळ्या असू नये. म्हणजेच चार वर्षांच्या शेवटी सेवामुक्त होणारा प्रत्येक अग्निवीर सरकारकडून मिळणारे 14 लाख अधिक स्वतः बचत केलेले साधारण 5 ते 6 लाख अशा स्वकष्टार्जित एकूण 20 लाख रुपयांचा धनी होऊ शकेल. देशातील 22 वर्षे वयाच्या एकूण सर्व तरुणांपैकी किती जणांकडे स्वकष्टार्जित असे 20 लाख रुपये असू शकतील याचा विचार करावा. याशिवाय सरकारतर्फे सेवामुक्त झालेल्या प्रत्येक अग्निवीरास सरकारतर्फे 80 लाखांचा आयुर्विमा मिळेल. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना नियमाप्रमाणे 80 लाख रुपये मिळतील. 80 लाखांचा आयुर्विमा स्वतःच्या खर्चाने घेणे देशामध्ये कितीजणांना परवडेल? सेवामुक्त होणार्या अग्निवीरांना भरपूर अशी आर्थिक सुरक्षा देण्याची भरपूर तरतूद सरकारने केली आहे, हे स्पष्ट आहे.
रकमेचा विनियोग
तथापि, 20 लाख रुपये खाऊन संपविण्यासाठी वापरू नयेत, अशी अपेक्षा आहे. उद्योगधंदा, गुंतवणूक इ. करायचे नसेल, तर ही सर्व रक्कम सरकारी बँकेत/पोस्टामध्ये ठेवली, तर आजमितीस दरमहा साधारण आठ ते नऊ हजार व्याज मिळू शकेल. यालाच पेन्शन का मानू नये? शिवाय तो अग्निवीर इतरत्र नोकरी, कामधंदा करण्यास मोकळा आहेच. व्याजाची रक्कम पुढील शिक्षणास उपयोगी पडेल.
ही योजना एकमेव नाही
चार वर्षांनंतर नोकरीची हमी नाही, हे फक्त या अग्निपथ योजनेमध्ये नाही. इतरत्रसुद्धा अशी परिस्थिती आहे. उदा. जे तरुण आर्टस्, सायन्स अगदी इंजिनिअर होतात, त्यांनासुद्धा चार/पाच वर्षांनंतर काय, हा प्रश्न आहेच. नोकरीची हमी नाही. अगदी आयआयएममधील प्राध्यापकांचीसुद्धा पाच वर्षांनंतर योग्य असल्यास नोकरी टिकते. नाही तर निरोप. हमी नाही. तेव्हा या मुद्द्यावरून टीका करण्यात अर्थ नाही.