पुणे : कारगिलनंतर आता लक्ष्य पीओके ; सेवानिवृत्त अधिकार्‍यांचा संकल्प

पुणे : कारगिलनंतर आता लक्ष्य पीओके ; सेवानिवृत्त अधिकार्‍यांचा संकल्प

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या तीन दिवसांपासून बरसणार्‍या वरुणदेवानेही उसंत घेत कारगिल विजयात जणू मानवंदनाच दिली की काय, असे चित्र पुण्यातील सदर्न कमांड वॉर मेमोरिअल येथील समारंभात दिसून आले. बिगुलांच्या स्वरानंतर लयबद्ध लष्करी बँड पथकाने धून वाजवली अन् आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांनी युद्ध स्मारकास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. पुण्यातील घोरपडी परिसरात असलेल्या सदर्न कमांड वॉर मेमोरिअल येथे कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास पुण्यातील लष्करी जवान आणि उच्च पदस्थ अधिकार्‍यांची उपस्थिती होती. कारगिल युद्धातील शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

वरुणराजाकडूनही श्रद्धांजली!
सदर्न कमांड वॉर मेमोरिअलच्या विस्तीर्ण प्रांगणात युद्धनौका, सुखोई, मोठ्या रणगाड्यांबरोबर शहीद जवानाची स्मारके उभी आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत पावसानेही उसंत घेत काही काळ स्तब्ध राहून जणू शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

लष्करी जवानांनी दाखविलेल्या शौर्यामुळेच हे ऑपरेशन यशस्वी झाले होते. या शौर्याची स्मृती जागृत राहावी, यासाठी कारगिल विजय दिन उत्साहात साजरा केला जातो. शत्रुराष्ट्राकडून कारगिलसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सरकारने सर्व ती खबरदारी घेतली आहे. पाकिस्तानने या विजयानंतरही धडा घेतला नसेल, तर लवकरच पाकव्याप्त काश्मीरदेखील कुठल्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतो, हा संकल्प प्रत्येक भारतीय जवानाने केलेला असल्याचे मत मेजर जनरल अशोक हुक्कू आणि वीरचक्र सन्मान मिळविणारे कर्नल गौतम खोत यांनी व्यक्त केले.

पाकिस्तानी सैनिकांनी विश्वासघातकीपणे ताब्यात घेतलेल्या उच्च चौक्यांच्या कमांडवर यशस्वीपणे पुन्हा दावा केला. कारगिल युद्ध 60 दिवसांपेक्षा जास्त काळ लढले गेले आणि 26 जुलै 1999 रोजी जवानांच्या शौर्याने विजय मिळविण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news