गोपीचंद पडळकर यांना गुरुवारी सभागृहात बोलण्यास सभापतींची बंदी! | Gopichand Padalkar | पुढारी

गोपीचंद पडळकर यांना गुरुवारी सभागृहात बोलण्यास सभापतींची बंदी! | Gopichand Padalkar

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधानपरिषद सभागृहात उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी भाजपचे सदस्य गोपीचंद पडळकर यांना गुरुवारी (दि. २७) सभागृहात बोलण्यास दिवसभर बंदी घालण्यात आली.

बुधवारी (दि. २६)  पुरवणी मागण्यावर पडळकर बोलत असताना सभापती डॉ. गोऱ्हे यांनी वेळेचे बंधन घालून त्यांना रोखले. यावर तुम्ही सभागृहाचे नियोजन नीट ठेवा, आम्ही बोलायला लागलो की बेल वाजवताय. सभागृहात तुम्ही मला जाणीवपूर्वक बोलू देत नाहीत, असा आरोप पडळकर यांनी गोऱ्हे यांच्यावर केला. तसेच हातातील कागदपत्रे फाडून त्यांनी गोऱ्हे यांचा निषेध केला. पडळकरांच्या या कृतीवर गोऱ्हे या देखील रागावल्या. पडळकर यांचे वर्तन संसदीय परंपरेला अनुसरून नसल्याचे सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तरी देखील पडळकर शांत होत नव्हते. अखेर डॉ. गोऱ्हे यांनी ‘मार्शल’ना बोलावून सभागृहाबाहेर काढण्याचा दम पडळकरांना भरला. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सदस्य सचिन अहिर, नरेंद्र दराडे यांनी या वादात मध्यस्थी करत पडळकरांना समज देण्याचा प्रयत्न केला.

अखेर माझी चूक नसतानाही मी माझे शब्द माघारी घेतो. पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही, असे सांगत पडळकरांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्याकडून गोऱ्हे यांच्याशी वाद घालण्याची जी कृती घडली त्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पडळकर यांना आवश्यक त्या सुचना वरिष्ठांकडून देण्यात येतील, असे सभागृहाला आश्वासित करतो, असे म्हणत शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी या वादावर पडदा टाकला.

हेही वाचा

Back to top button