पुढारी ऑनलाईन: उत्तराखंड काँग्रेसमधील वाद संपवण्यासाठी काँग्रेस हायकमांड सक्रिय झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाराज हरीश रावत यांच्याशी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने संपर्क साधला असून नाराजी दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. केरळहून परतल्यानंतर राहुल गांधी शुक्रवारी उत्तराखंडमधील नेत्यांची भेट घेऊ शकतात, ज्यामध्ये हरीश रावतही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करणे, तिकीट वाटपात पुरेसा सहभाग यासाठी हरीश रावत पक्षावर दबाव आणत आहेत. राज्याचे प्रभारी देवेंद्र यादव यांच्या कार्यपद्धतीबद्दल ही त्यांची तक्रार आहे. जर या गोष्टीं घडल्या नाही तर 5 जानेवारीला हरीश रावत डेहराडूनमध्ये मोठी घोषणा करू शकतात. रावत समर्थकांना डेहराडूनमध्ये जमण्यास सांगण्यात आले आहे. नाराज असेलेले हरीश रावत 5 जानेवारीला राजकारणातून निवृत्तीची घोषणा करू शकतात, असा रावत कॅम्पचा दावा आहे.
हरीश रावत, प्रीतम सिंग, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गणेश गोदियाल यांच्यासह पक्षाचे नेते यशपाल आर्य हेही शुक्रवारी दिल्लीत पोहोचणार आहेत. हरीश रावत हे सध्या बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी ट्विट करून आपल्याच पक्षाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्ष संघटना कथितपणे सहकार्य करत नसून आपण सर्व काही सोडून देण्याचा विचार करत असल्याचे सांगून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. एका ट्विटमध्ये ते म्हणाले, मनात अनेकवेळा एक विचार येतो की, 'हरीश रावत, आता खूप झाले, खूप मेहनत केली, आता विश्रांतीची वेळ आली आहे'. पण नंतर मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज येतोय की "न दैन्यं न पलायनम्". खूप द्विधा मनस्थितीत आहे, नवीन वर्ष मार्ग दाखवू शकेल. मला विश्वास आहे की भगवान केदारनाथजी मला या परिस्थितीत मार्गदर्शन करतील असं देखील रावत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
रावत यांचे मीडिया सल्लागार सुरेंद्र कुमार यांना या ट्विटबद्दल विचारले असता, त्यांनी उत्तराखंडमध्ये पक्षाला अडचणीत आणण्यासाठी पक्षातील काही लोक भाजपशी हातमिळवणी करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले होते, 'उत्तराखंडमध्ये हरीश रावत यांच्याशिवाय पर्याय नाही. पक्षाचा झेंडा रोवणारे ते राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. मात्र राज्यात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता संपुष्टात आणण्यासाठी काही लोक भाजपच्या प्रभावाखाली काम करत आहेत. रावत यांच्या या ट्विटनंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. रावत यांना टॅग करत त्यांनी ट्विट केले की, 'तुम्ही जे पेरता तेच उगवते. हरीश रावत यांना भविष्यातील योजनांसाठी (असल्यास) शुभेच्छा.'