बिहार नंतर आता टिईटी गैरव्यवहारांचे दिल्ली कनेक्शन उघड

बिहार नंतर आता टिईटी गैरव्यवहारांचे दिल्ली कनेक्शन उघड

पुणे : पुढारी वृत्तसेवा

ऑनलाईन पेपर कसे फोडावे याच्या विविध पध्दतीबाबत प्रशिक्षणाचे बिहार येथील पटना कनेक्शन सायबर पोलिसांनी उघड केल्यानंतर सायबर पोलिसांनी आता टीईटी गैरव्यवहाराचे दिल्ली कनेक्शन उघड केले आहे. दिल्लीत 2017 मध्ये संशयीत आरोपी सौरभ त्रिपाठी, अभिषेक सावरीकर व प्रितेश देशमुख यांच्यामध्ये बैठक झाली होती. येथेच टीईटी परिक्षेत अपात्र परिक्षार्थ्यांना पात्र करणेबाबत कट शिजल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

संतोष हरकळ याच्याकडे केलेल्या तपासात त्याने सुरंजीत पाटील, स्वप्नील पाटील, मुकुंद सुर्यवंशी, कलीम खान व अशोक मिसाळ यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये टीईटी 2018 च्या परिक्षेत परिक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी एकुण 650 परिक्षार्थींची यादी तयार केली. ती पेनड्राईव्ह मध्ये घेत शिवाजीनगर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये प्रितेश देशमुख याला दिली गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर टीईटी गैरव्यवहार प्रकरणी परिक्षेचे आयोजन करणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस या कंपनीचा संचालक डॉ. प्रितेश देशमुख याच्या सांगण्यावरून दलाल अंकुश हरकळ याने सुरंजीत पाटील, स्वप्नील पाटील यांच्यासह इतरांकडून जमा केलेली 5 कोटी 37 लाख रूपयांची रक्कम बंगळुरू येथील कंपनीचा संचालक अश्विनकुमार याला दिली असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

सायबर पोलिस मध्यस्थाच्या शोधात

ज्या परिक्षार्थीकडून गुण वाढविण्यासाठी रकमा गोळा केल्या गेल्या ते परिक्षार्थी कोणाच्या मार्फत आरोपींच्या संपर्कात याचा सायबर पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. सध्या संबंधीत परिक्षार्थीचा नाव आणि परिक्षेतील सीट क्रमांकाचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. यानंतरच टीईटी गैरव्यवहाराचा आणखीन उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. काही आरोपींचे संबंध हे भारतातील विविध परीक्षा फुटीशी असून 15 वर्षापासून काही जण सक्रीय सहभागी असल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे. तसेच अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जणांनी ऑनलाईन पेपर फोडल्याचे प्रशिक्षण घेतले असल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली.

आतापर्यंत टीईटी गैरव्यवहारात अटक आरोपी

सुखदेव डेरे, अश्विनकुमार शिवकुमार, सौरभ त्रिपाठी, निखील कदम, अभिषेक सावरीकर, संतोष हरकळ, तुकाराम सुपे, डॉ. प्रितेश देशमुख, सुरंजित पाटील, स्वप्निल राजपूत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news