मोठी बातमी! पीक कर्ज देण्यापूर्वी CIBIL स्कोरची अट लावल्यास बँकांवर होणार गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : पीक कर्ज वाटप करताना सिबिल स्कोअरची अट लागू करता येणार नाही, असा निर्णय राज्यस्तरीय बँकिंग समितीने आधीच घेतला आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटप करण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आज अमरावती येथे माध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पीक कर्ज वाटप करताना सिबिल स्कोअरची अट लागू करता येणार नाही, असा निर्णय राज्यस्तरीय बँकिंग समितीने आधीच घेतला आहे. त्याबाबत रिझर्व्ह बँकेने परिपत्रकही जारी केले आहे. तरीही जर एखादी बँक पीक कर्ज मागणार्‍या शेतकर्‍यांकडून CIBIL स्कोअर विचारत असल्याचे आढळले, तर अशा बँकेविरुद्ध FIR दाखल केला जाईल. अमरावतीमधील काही बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली अनुदानाची रक्कम कर्जफेडीकडे वळवली आहे. शेतकऱ्यांना त्रास दिल्यास अशा बँकांवर कारवाई केल्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय राहणार नाही. सर्व बँका हे करत नाहीत, पण अमरावतीतील काही बँका अशा प्रकारात गुंतलेल्या आढळल्या आहेत. कर्ज वसुलीसाठी अनुदानाची रक्कम वापरू नका, असे मी बँकांना सक्त आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

बियाणांत फसवणूक झाली तर विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई

बियाणांत फसवणूक झाली तर संबंधीतांवर फौजदारी खटला भरला जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. वर्धा येथे फडणवीस यांनी खरीप आढावा बैठक घेतली. पेरणीसाठी शेतकऱ्यांना योग्य बियाणं उपल्बध करून दिली जातील. पेरणीसाठी पुरेशी बियाणे आहेत. तरीही बाहेरून घेत असलेल्या बियाणांची गुणवत्ता तपासण्याच्या सुचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी बियाणांची पावती जपून ठेवावी. बियाणे घेतल्यानंतर त्याच्यात फसवणूक झाली तर भरपाई मिळते, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. शिवाय बोगस बियाणे विक्रेत्यांवर फौजदारी खटला भरला जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी विक्रेत्यांना दिला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news