ठाणे : पुढारी वृत्तसेवा, 'द केरला स्टोरी' चित्रपटावरून देशात वाद सुरू आहे. भाजपशासित राज्यात हा चित्रपट 'टॅक्स फ्री' करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'द केरला स्टोरी' चित्रपटात खोटी माहिती दाखविणाऱ्या चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे, असा संताप व्यक्त केला होता. त्यावरून राज्यात आरोप प्रत्यारोप होत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आव्हाड यांच्यावर टीका केली. यात वादात ठाण्यातील एका हिंदू प्रेमीने आव्हाड यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात अदखल पात्र (एनसी ) गुन्हा दाखल केला आहे.
"द केरला स्टोरी चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली. अधिकृत महिलांचा आकडा ३ आहे, तरी ३२ हजार करून दाखवण्यात आला. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सर्वाजनिकरित्या फासावर लटकवलं पाहिजे," असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी आपल्या ब्लॉगमध्ये केले होते. त्यानंतर आपण राग व्यक्त केला, त्याचा शब्दाश अर्थ घेऊन राजकारण केले जात असल्याचे आव्हाड यांनी काल स्पष्ट करीत फाशीला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर वादावर पडदा पडण्याच्या शक्यता असताना आज ठाण्यात पोलिस तक्रार झाली आणि आमदार आव्हाड यांच्या विरोधात एनसी अर्थात अदखल पात्र गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे.
याबाबतची माहिती स्वतः आव्हाड यांनी ट्विट करत दिली आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की "चित्रपटाची बदनामी केली म्हणून काही भक्तांनी वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्ह्यामध्ये म्हटलं आहे की द केरला स्टोरी या चित्रपटाची जितेंद्र आव्हाड यांनी बदनामी केली. माझा प्रश्न असा आहे की, कुरुलकर या अतिशय महत्वाच्या जागी असलेल्या संशोधकाने या देशाची अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला दिली. तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या राज्याचा प्रतिनिधी नाही तर तो गद्दार आहे. आता कुरुलकरवर बोललो म्हणजे मी कुठल्या जातीबद्दल बोललो असे होत नाही. किंवा कुठल्या धर्माबद्दल बोललो असे होत नाही. विकृतीला गद्दारीला आणि आतंकवादाला धर्म, जात, पंथ, राष्ट्र नसते. हे यावरुन तरी आपल्या लक्षात येईल. कुरुलकरचे मूळ आणि कुळ शोधा मग कळेल आपल्याला.
नशीबाने द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित व्हायला आणि कुरुलकरने एका बाईसाठी देश विकायला एकच वेळ आली. यालाच योगायोग म्हणतात. हाच कुरुलकर पुण्यामध्ये सावरकर व्याख्यानमालेत देशभक्तीचे व्याख्यान देत होता. आता याला आपण काय म्हणाल? याच्या नावाने कोणती फाईल्स किंवा कोणत्या स्टोरीचा चित्रपट बनवायचा. आता मात्र ट्रोलर्स आणि माझ्यावर आग ओकणारे तोंडावर बोट ठेवून आज दिवसभर शांत राहतील. ज्यांच्या डीएनएमध्येच गद्दारी आहे, फितुरी आहे ते आम्हांला काय अक्कल शिकवणार. ह्याला इतिहासच साक्ष आहे."
हे ही वाचा :