नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात गत वर्षभरात ३४ हजार ११४ अपघातांमध्ये १५ हजार नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. २०२२ च्या तुलनेने अपघाती मृत्यूंमध्ये १.४ टक्के घट झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अपघातांचे ब्लॅक स्पॉटही गेल्या तीन वर्षांपासूून कमी झाले आहेत.
राज्यात जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १ लाख ५४ हजार ८७० अपघातांची नोंद झाली आहे. त्यात ६८ हजार ११८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ८९ हजार ५९६ जण गंभीर जखमी झाले, तर ३८ हजार १२८ जण किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. त्यात २०२२ मध्ये सर्वाधिक १३ हजार ३८३ अपघातांमध्ये १५ हजार २२४ जणांचा मृत्यू झाला होता. तर गतवर्षी अपघातांमध्ये २.२ टक्के वाढ झाली. त्यानुसार ३४ हजार ११४ अपघातांमध्ये १५ हजार नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली, तरी अपघाती मृत्यूंमध्ये किंचित घट झाल्याचे सकारात्मक चित्र पाहावयास मिळाले.
वर्ष | अपघात | मृत्यू | गंभीर जखमी | किरकोळ जखमी |
---|---|---|---|---|
२०१९ | ३२,९२५ | १२,७८८ | १९,१५२ | ९,४७६ |
२०२० | २४,९७१ | ११,५६९ | १३,९७१ | ५,९४३ |
२०२१ | २९,४७७ | १३,५२८ | १६,०७३ | ६,९९८ |
२०२२ | ३३,३८३ | १५,२२४ | १९,५४० | ७,६९९ |
२०२३ | ३४,११४ | १५,००९ | २०,८६० | ८,०१२ |
अपघात कमी करण्यासाठी उपाययोजन
– रमलर्स, कलर फ्लॅग, वेगमर्यादा फलक, वाहतूक नियमांचे फलक लावण्यात आले.
– इंटरचेंज पॉइंटजवळ ट्रॅव्हल्सची तपासणी केली जाते. त्यात अग्निशमन यंत्र, वाहनचालक परवाना, परमीट, प्रवासी संख्या, टायर स्थिती याची तपासणी केली जाते.
– पोलिसांसह, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी, प्रादेशिक परिवहन विभागातर्फे संयुक्तरीत्या वाहनांची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांना मदत केली जाते, बेशिस्त चालकांवर कारवाई केली जाते.
– पी. ए. सिस्टीममार्फत वाहनचालकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले जाते.
– अपघात कमी करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
– सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात आहे.
अपघात प्रवण क्षेत्र झाले कमी
राज्यात २०२१ मध्ये १ हजार चार अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) होती. त्यानंतर २०२२ मध्ये ७४२ अपघात प्रवणक्षेत्र होती. न्हाई, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक परिवहन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मदतीने अपघातप्रवण क्षेत्रात दुरुस्ती, बदल करीत अपघात कमी करण्यावर भर दिल्याने ही क्षेत्र कमी झाल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा :