Pune News : पालिकेला घ्यावी लागणार पुन्हा पर्यावरण मान्यता | पुढारी

Pune News : पालिकेला घ्यावी लागणार पुन्हा पर्यावरण मान्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नदी सुधार प्रकल्पांतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या मुळा-मुठा नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पाचे सुरू असलेले तीन टप्पे सोडून उर्वरित आठ टप्प्यांचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेला सुधारित पर्यावरणीय मान्यता घ्यावी लागणार आहे. या अनुषंगाने आठवडाभरात सर्व बाबींची पूर्तता केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

महापालिकेने मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचे काम अकरा टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या तीन टप्प्याचे काम सुरू झाल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी या कामावर आक्षेप नोंदविले होते. तसेच महापालिकेने जरी पर्यावरणीय परिणामांच्या अहवालास मान्यता घेतली असली तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. असा आरोप करत पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) धाव घेतली होती. एनजीटीने महापालिकेला पुरस्थितीसंदर्भातील तांत्रिक माहितीसह स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट अ‍ॅथोरीटीकडे (सिया) पर्यावरणीय मान्यता असलेला सुधारित अहवाल सादर करावा, त्यानंतरच उर्वरीत आठ टप्प्यातील काम सुरू करण्याचे आदेश दिले.

या आदेशात काम सुरू असलेल्या तीन टप्प्याचे काम स्थगित करण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत. या आदेशानुसार महापालिकेने सुधारीत पर्यवरणीय अहवालासाठी सिया संस्थेकडे प्रस्ताव दिला आहे. पर्यावरण प्रेमींनी नोंदविलेल्या आक्षेपानुसार सियाने महापालिकेला काही बाबींची पुर्तता करण्यास सांगितले आहे. त्यानुसार प्रकल्पाचा हायड्रोलॉजी अभ्यास अहवाल, नदीकाठावर चॅनेलायजिंग केल्यामुळे नदीच्या पुर पातळीत किती वाढ होईल, नदीकाठाच्या भागात किती ठिकाणी पुराचे पाणी साठून राहू शकते, गेल्या शंभर वर्षातील नदीच्या पुराच्या पाण्याच्या पातळीची आकडेवारी लक्षात घेत पुर पातळी निश्चित करावी, ढगफुटी सारखे प्रमाण वाढल्यास काय उपाययोजना, प्रकल्पाच्या बांधकाम आणि नदीपात्रालगतच्या बांधकामांची माहीती, आदी माहिती महापालिकेला द्यावी लागणार आहे. दरम्यान, ’सिया’च्या सुचनेचा आधार घेत पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी नदी सुधार प्रकल्पाला पर्यावरण परवानगी नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे.

नदी सुधार प्रकल्पाच्या अनुषंगाने सिया संस्थेला द्यावयाच्या सर्व माहितीची आठवडाभरात पूर्तता केली जाणार आहे. यामुळे नदीकाठ सुशोभीकरणाच्या सुरु असलेल्या तीनही टप्प्याच्या कामावर कसलाही परिणाम होणार नाही. या कामाला कोणत्याही प्रकारची स्थगिती नाही. त्यामुळे हे काम सुरूच राहणार आहे.

– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका.

हेही वाचा

Back to top button