अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.14) नगर-दौंड रस्त्यावरील पांजरपोळ संस्थेजवळ घडली. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. साहिल सादिक शेख (रा.बुरूडगाव रस्ता, नक्षत्र लॉनजवळ, नगर), संतोष मोरे (रा.चिपाडे मळा, नगर) अशी मयतांची नावे आहेत. तर, विकी राजू कांबळे (वय 21 रा. रांजणी माथणी, ता.नगर), तेजस राजेंद्र ठोंबे (रा.नगर) व इतर एक असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दौंडकडून नगरकडे येत असताना पांजरपोळ संस्थेजवळ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुरुवातीला कार दुभाजकावर जाऊन धडकली. दुभाजकाची उंची कमी असल्याने कार पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली व रस्त्यावर पलटी झाली. कारमधील तिघे बाहेर फेकले गेले. गंभीर मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा