छत्रपती संभाजीनगर : आठवडी बाजारात दोन गटात हाणामारी
अजिंठा पुढारी वृत्तसेवा : अजिंठा गावातील आठवडा बाजारात रविवारी तरुणांच्या हुल्लडबाजीनंतर दोन गटात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेनंतर बाजारात आणि परिसरात अफवा पसरल्याने गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. मात्र, याची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच बाजारात धाव घेतल्याने मोठी अनर्थ टळला. तर पोलिसांनी बाजारात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
अजिंठा गावातील आठवडा बाजारात बाळापूर येथील दोन टवाळखोर युवकांनी येवुन बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या महिला, युवतींचा पाठलाग करत असल्याबाबत अजिंठा गावातील काही स्थानिक युवकांना संशय आला. त्यांनी या संशयावरून बाहेरून आलेल्या त्या दोन मुलांची चौकशी केली. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची होवुन दोन्ही गटात तुंबळ हाणामारी सुरू झाली होती. यामुळे अजिंठा येथील गांधी चौक परिसरात गोंधळ निर्माण होवुन हे तरूण आपसात भिडल्याने बघणाऱ्यांचा मोठया प्रमाणावर जमाव जमला होता. त्यात बाजार असल्याने बाजारात अफवा पसरली आणि लोकांचा गोंधळ उडाला. काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला.