बिनमुंडक्याच्या धडाची गोष्ट! चिकन 65 मुळे मिळाला क्ल्यू, १०० रुपयांसाठी तरुणांची जिंदगानी बरबाद

बिनमुंडक्याच्या धडाची गोष्ट! चिकन 65 मुळे मिळाला क्ल्यू, १०० रुपयांसाठी तरुणांची जिंदगानी बरबाद
Published on
Updated on

वाळवा तालुक्याचे ठिकाण असलेल्या उरुण इस्लामपूरसाठी त्या दिवशीची सकाळ नेहमीप्रमाणेच उगवली… मात्र त्या दिवशी वातावरणात नक्कीच काहीतरी वेगळेपण जाणवत होते आणि ती बातमी वार्‍यासारखी शहरभर पसरली. पाहता पाहता सार्‍या शहरातील लोक त्या शाळेकडे धाव घेऊ लागले… काय झाले होते शाळेत……!

शाळेच्या मैदानात एका बाजूला दिसत असणारे ते दृश्य पाहताक्षणी अंगावर शहारे आणणारे ठरत होते. मैदानात एक शिर नसलेले मानवी धड पडले होते. मस्तक नसलेले धड पाहायला अवघे शहर लोटले होते. मृताचे वय फार तर एकवीस- बावीसच्या घरातील असावे. कपड्यावरून तर तो कष्टकरी असावा हे स्पष्टच होते. पाहणारे चर्चा करत होते कोण हा दुर्दैवी तरुण असावा आणि त्याचे मस्तक कोणी तोडून नेले असावे. काही क्षणातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र मुंडके नसलेले धड पाहून पोलिसदेखील चक्रावून गेले. तोपर्यंत पोलिस निरीक्षक रावसाहेब सरदेसाई हे देखील घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांची चर्चा सुरू असतानाच दुसरी बातमी आली की, मैदानाच्या एका कडेच्या वीज खांबाला एक पिशवी अडकवली असून त्यात एक मुंडके प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवले आहे.

चिकन 65चे वाळलेल्या पीसमुळे मिळाला क्ल्यू

या सार्‍या घटनाक्रमाने पोलिसदेखील चक्रावून गेले होते. मात्र काहीच ट्रेस लागत नव्हता. सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. मात्र हल्लेखोराने काहीच मागसूम ठेवला नव्हता. या तरुणाचा खून करण्याचे कारण काय, तो कोणी केला आणि का केला या प्रश्नांच्या वावटळीत पोलिस तपासाला दिशा मिळत नव्हती. सरदेसाई ऑफिसमध्ये काही काळ स्तब्ध बसले. विचार करता करता त्यांना काहीतरी क्लिक झाले. त्यांच्या मनाने काही तरी टिपले. क्षणात बेल वाजवून त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढण्याचा आदेश दिला. 'चल…' सरदेसाईंचा आदेश ऐकताच गाडी सुसाट सकाळच्या शाळेच्या पटांगणात आली. सरदेसाई घटनास्थळी गेले. बारकाईने पाहू लागले. मृतदेह पडलेल्या जागेत मार्किंग करण्यात आले होते. तिथे काही अंतरावर चिकन 65चे वाळलेले पीस पडलेले होते! सरदेसाईंना एक क्ल्यू मिळाला होता.

तपासाला काही तरी दिशा मिळाली होती. सरदेसाई यांनी तिघा कॉन्स्टेबलना बोलवून घेतले आणि त्या शाळेच्या जवळपास असलेल्या, रस्त्यालगत उशिरापर्यंत चिकन 65 ची विक्री करणार्‍या हातगाडीवाल्यांना बोलवून आणण्याचा आदेश दिला. अर्ध्या-पाऊण तासाच दहा-बारा चिकन 65 ची विक्री करणारे गाडेवाले त्यांच्यासमोर हजर झाले. त्यांनी प्रत्येकाला विश्वासात घेऊन विचारणा सुरू केली. एकाने सांगितले, साहेब, रात्री माझ्याकडे दोघेजण आले होते. दोघांनी एकेक प्लेट चिकन 65चे पार्सल घेतले. ते नशेत एकमेकांना बडबडत होते. त्यातील एकजण सारखा म्हणत होता… सूर्या, मी तुला सोडणार नाही. झाले. एवढाच धागा मिळाला खरा; पण त्याच्या मदतीने स्वर्ग गाठण्याचे आव्हान पोलिसांना होते.

एव्हाना पोलिसांच्या पथकाने त्या शाळेच्या परिसरातील झोपडपट्टीत शोध मोहीम सुरू केली होती. यातच दोन दिवस गेले. घटनेच्या तिसर्‍या दिवशी एका पोलिसाला समजले की, त्या वस्तीमधील एक तरुण आपल्या मित्रासह तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिस तपास करत करत त्या मित्राच्या घरी पोहोचले. नेमका तो त्याचवेळी घरी आलेला होता. पोलिसांना पाहताच तो पळू लागला. पण पोलिसांनी त्याला क्षणात जेरबंद केले. ठाण्यात आणून त्या तरुणाला पोलिसी खाक्याचा प्रसाद दिला. पण तो काहीच दाद देईना. मात्र शेवटी मेरी आवाज सुनो पुढे त्याने सपशेल लोटांगण घातले.

शंभर रुपयांसाठी तरुणांची जिंदगानी बरबाद

सूर्याने संदीपकडून शंभर रुपये उसने घेतले होते. मात्र तो परत देण्यास टाळाटाळ करत होता. यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होता. त्या दिवशी नेहमीप्रमाणे चिकन 65 खाण्यासाठी पार्सल घेतले. बरोबर पिण्यासाठी एकेक क्वार्टर घेतली. शाळेच्या आवारात चिकन खाता खाता संदीपने विचारले, सूर्या… माझ्या पैशाचे काय करणार? कधी देणार आहेस? अक्काबाई पोटात गेलेला सूर्या म्हणाला, देत नाही जा. काय करणार आहेस. नशेत चूर झालेला संदीप आज ठरवूनच आला होता. आज कंडका पाडायचाच! त्याने हातातील पिशवीतून पटाशी काढली आणि काही कळायच्या आत सूर्याच्या मानेवर वार केला. मग संदीपने लाकूड तासावे तशी त्याची मान खापलण्यास सुरुवात केली. काही क्षणातच सूर्याचे मुंडके धडावेगळे झाले. त्याने ते मुंडके सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले. धड मैदानातच पडू दिले आणि मुंडके असलेली पिशवी मैदानाच्या बाजूला असलेल्या एका विजेच्या खांबाला अडकवली. संदीपच्या तोंडून हा सारा घटनाक्रम ऐकताना पोलिसदेखील हादरून गेले. मात्र केवळ शंभर रुपयांसाठी दोघा कोवळ्या तरुणांची जिंदगानी बरबाद झाली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news